मुंबई : सप्टेंबर महिना सुरू होताच शालेय सहलीसाठी शैक्षणिक मंडळे आणि शाळांची बस बुकिंगसाठी हालचाल सुरू होते. या काळात एसटीचे ‘सिझन’ नसल्यामुळे सहलींच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने शिवशाहीला प्रमोट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.एसटी महामंडळ ‘आॅफ सिझन’मध्ये कमाईसाठी शालेय सहलींसह, एक दिवसीय कार्यक्रमांसाठी एसटी भाड्याने देते. महामंडळाच्या व्यवहार्य भाषेत याला नैमित्तिक करार म्हणून ओळखले जोते. गेल्या दोन वर्षांपासून या काळातील उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याने महामंडळाच्या चिंतेत वाढ होत आहे. महामंडळाच्या पारंपरिक एसटी अस्वच्छ असल्याने, बहुतांशी शाळा खासगी कंपनीच्या बसला पसंती देतात. यामुळे महामंडळाच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाही शालेय सहलींसाठी ‘प्रमोट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय सहलींसाठी शिवशाही ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून, देण्याबाबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.२०१५-१६ काळात महामंडळाने ३१ हजार ५५२ नैमित्तिक करार केले होते. या करारातून महामंडळाला ६४ कोटी ४८ लाख ८० हजार उत्पन्न मिळाले होते. मात्र, २०१६-१७ या काळात महामंडळाने केवळ २९ हजार ४८५ करारांतून ५८ कोटी ६० लाख २४ हजारांचा महसूल मिळविला.सद्यस्थितीत ९०० हून जास्त बैठ्या आसनी शिवशाही राज्यात धावत आहेत, तर सुमारे १०० पेक्षा जास्त शयनयान शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात आहेत. शिवशाही ही वातानुकूलित आणि अत्याधुनिक असल्यामुळे तिला मराठी माध्यमांसह इंग्रजी माध्यमांच्या शाळा पसंती देतील. त्यामुळे आॅफ सिझनमध्ये शिवशाही नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास सहलींसाठी पारंपरिक एसटी घेऊन जाणाºया चालकांनी व्यक्त केला.संवादाचा अभावउत्पन्न घटण्यात अस्वच्छ एसटी, वरिष्ठ अधिकाºयांची मनमानी, ढिसाळ नियोजन, वरिष्ठ अधिकारी आणि शालेय व्यवस्थापन यांच्यात समन्वयाचा अभाव या गोष्टींचा समावेश आहे. शालेय सहलींसाठी सप्टेंबर महिन्यापासून बुकिंग प्रक्रियेला वेग येतो. मात्र, या काळात अधिकारी आणि शालेय प्रशासन यांच्यात योग्य संवादाचा अभाव असल्याने, शालेय प्रशासनाकडून खासगी बस बुकिंग केली जाते, अशी माहिती एसटीतील अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली.
एसटीला उत्पन्नवाढीसाठी ‘शिवशाहीचा’ आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:29 AM