मुंबई - पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. त्या ठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक जगभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लंकेचं फोन करुन कौतुक केलं होतं. तर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट देऊन स्तुतीसुमनं उधळली आहेत. मात्र, कडवट शिवसैनिक असलेल्या निलेश लंकेच्या हाती भगवा दोरा पाहून आजही त्यांच्यातील शिवसैनिक जिवंत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला होता.
आजही निलेश लंकेच्या हातावर शिवबंधन आहे. जर, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेत येण्याची हाक दिली, तर तुम्ही साथ द्याल का? असा प्रश्न निलेश लंके यांना विचारण्यात आला होता. त्यावर, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पोराला ज्या पक्षाने आमदार केलं, ते मी विसरू शकत नाही. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे माझे दैवत आहेत. हातावरील शिवबंधनाबद्दल बोलताना, जो जसं पाहतो तसं ते दिसतं. काहींना ते शिवबंधन वाटेल, काहींना मंदिरातील धागा वाटेल, असे लंके यांनी म्हटलं.
मी शिवसेनेत होतो, पण आता माझा आणि शिवसेनेचा संबंध नाही. मी राष्ट्रवादीचा, शरद पवारांचा सच्चा भक्त आहे. म्हणूनच, या आरोग्यमंदिराचं नावही शरदचंद्र पवार असंच आहे. माझ्या नसानसात राष्ट्रवादी आहे, अशा शब्दात शिवसेनेत जाणार नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.
तेव्हापासून निलेश लंके कडवट शिवसैनिक
लंके पाचवी-सहावीत असतानाची गोष्ट आहे. तेव्हा हंगा बसस्थानकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थांबले होते. तेव्हा गर्दीतून वाट काढत निलेश लंके बाळासाहेबांपर्यंत पोहोचले. बाळासाहेबांना जवळून पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे ते बाळासाहेबांजवळ गेले. बाळासाहेबांनीही या लहानग्या निलेशच्या डोक्यावर हात ठेवला अन् तेव्हापासून लंके यांना समाजकारणाचं वेड लागलं ते आजतागायत कायम आहे. त्यादिवसापासून ते कडवट शिवसैनिक बनले होते.
राष्ट्रवादीत प्रवेश
जानेवारी 2019मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेत शिवसेना आमदार विजय औटी यांच्याशी न पटल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्य़ातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यांच्या समर्थकांनी उद्वव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं सांगण्यात येत होतं.
जयंत पाटील यांनी दिली कोविड सेंटरला भेट
आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा शरद पवार सामान्यांसाठी धावून जातात, त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, निलेश लंके यांच्या विनंतीला मान देत जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार लंके भावूक झाले होते.