मुंबई : ‘दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांनी आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्यानंतर १९५२ - २०१८ या काळामध्ये महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. खूप चांगल्या सोयी - सुविधाही निर्माण झाल्या. मात्र, तरीही त्यानंतर आपण जाधव यांच्याव्यतिरिक्त आॅलिम्पिक पदक विजेता निर्माण करु शकलो नाही. तेव्हा आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या आॅलिम्पिक पदकाचा दुष्काळ खेळाडूंनी संपवला पाहिजे,’ असा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना दिला.महाराष्ट्रच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच ऐतिहासिक ‘गेट वे आॅफ इंडिया’ येथे शनिवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्याचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ अशी तीन वर्षांच्या पुरस्काराचे एकाचवेळी वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक केलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, संघटित व माजी खेळाडू अशा एकूण १९५ व्यक्तींना त्यांच्या क्रीडा योगदानाबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.राज्यपाल सी. विद्यासागर राव, क्रीडामंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पुण्याच्या रमेश तावडे (२०१४-१५), पुण्याच्याच डॉ. अरुण दातार (२०१५-१६) आणि कोल्हापूरच्या बिभीषण पाटील (२०१६-१७) यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे गौरविण्यात आले.राज्यपाल राव यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘महाराष्ट्राला मोठी क्रीडा संस्कृती लाभली आहे. अनेक खेळांना राजाश्रयही लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तलवारबाजी, घोडेस्वारी आणि इतर साहसी खेळांप्रती नेहमी पुढाकार असायचा. त्याचप्रमाणे कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्ती खेळाला राजाश्रय देतानाच त्यात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. आज आपल्याकडे अनेक गुणावन खेळाडूंची खाण आहे. अनेक खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकाची कमाई करत आहेत. त्यामुळे आता त्यांनी २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या आॅलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवावा अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे, आगामी आशियाई खेळातही महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी नोंदवू शकतात आणि हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना असेल.’
क्रीडाविभागाने थोपाटली स्वत:ची पाठ...तीन वर्षांचे पुरस्कार एकाचवेळी प्रदान करताना यामागचे कारण देताना राज्य क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आपल्याच विभागाची आणि स्वत:ची पाठ थोपाटली. तावडे म्हणाले की, ‘माझ्या कार्यकाळामध्ये अडीच वर्षांच्या उशीराने हा पुरस्कार सोहळा होत आहे. पण ज्यावेळी पहिल्यांदा मी हा पुरस्कार सोहळा जाहीर केला होता त्यावेळी माझ्याकडे ३०० हून अधिक तक्रारी आल्या. पुरस्कार प्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे मी खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांसह चर्चा करुन या पुरस्कार प्रक्रियेतील काही त्रुटी दूर करुन नवी गुणांकन पद्धत अवलंबली आणि सर्व अर्ज आॅनलाइन पद्धतीने मागवल्या. शिवाय प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक यांचे गुणांकन त्यांच्या कामगिरीनुसार ठरविण्यात आले. हे सर्व आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले असल्याने सर्वांसमोर ‘पारदर्षक’पणे यंदाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.’
या स्टार खेळाडूंचा सन्मान गेल्या तीन वर्षांचे रखडलेले पुरस्कार एकाचवेळी जाहीर करताना राज्य शासनाने राज्यातील खेळाडूंचा गौरव केला. यामध्ये ग्रॅंडमास्टर विदीत गुजराती आणि अक्षयराज कोरे, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे, हाॅकीपटू युवराज आणि देविंदर वाल्मिकी, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि नितीन मदने, धावपटू ललिता बाबर आणि संजीवनी जाधव, रोईंगपटू दत्तू भोकनळ, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांसारख्या स्टार खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
राज्य शासनाचा हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्यासाठी मी खूप प्रतीक्षा केली होती. आज हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत असून यामागे माझ्या सर्व प्रशिक्षकांची मेहनत आहे. त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. शिवाय माझ्या परिवारानेही मला खूप पाठिंबा दिला. त्यांच्याशिवाय हे सर्व शक्यच झाले नसते. खरं म्हणजे हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी एक निमित्त ठरले, पण खरी मेहनत माझ्या प्रशिक्षक आणि परिवाराची आहे. माझ्या जिम्नॅस्टीक खेळाला यंदा अनेक पुरस्कार मिळाले याचाही अत्यंत आनंद आहे. शिवाय औरंगाबादमधून यावर्षी तब्बल १६ व्यक्तींना यंदाचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचा खूप अभिमान वाटतो.- इशा महाजन, शिवछत्रपती पुरस्कार विजेती, जिम्नॅस्टीक - औरंगाबाद