मुंबई – माजी मंत्री नवाब मलिक सध्या २ महिन्याच्या जामीनावर बाहेर आहेत. मात्र त्यांच्यावरील वेगवेगळे खटले आजही सुरूच आहेत. मोहित कंबोज बदनामी प्रकरणी आज नवाब मलिक शिवडी कोर्टात दाखल झाले होते. याठिकाणी मलिकांना दिलासा मिळाला आहे. २ लाखांच्या जातमुचलक्यावर शिवडी कोर्टाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला आहे.
नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. २०२१ पासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यात मोहित कंबोज यांनी कुठलीही तडजोड करणार नाही. माझी भूमिका कायम आहे. २०२१ मध्ये माझ्याविरोधात जे खोटे आरोप नवाब मलिकांकडून लावले गेले होते. त्यावर नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. त्यातून दिलासा मिळावा यासाठी नवाब मलिकांनी आज शिवडी कोर्टात अर्ज केला होता. त्यावर कोर्टाने २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मलिकांना जामीन मंजूर केला आहे.
नवाब मलिक कोर्टात हजर झाल्याने त्यांच्याविरोधातील नॉन बेलेबल वॉरंट रद्द करण्यात आले. या खटल्याची सुनावणी व्हावी अशी आग्रही मागणी मोहित कंबोज यांनी कोर्टाकडे केली, ती कोर्टाने मान्य केली. येत्या २५ ऑक्टोबरपासून या प्रकरणात सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुनावणीवेळी कोर्टाने मलिक आणि कंबोज यांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
२०२१ मध्ये क्रुझवरील पार्टीत मोहित कंबोज यांचे मेव्हुणेही होते, परंतु त्यांना एनसीबीने ताब्यात घेतले नाही. मुंबईतील भाजपा नेत्याने फोन केल्यानंतर त्याला सोडण्यात आले आरोप तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मोहित कंबोज यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. मोहित कंबोज हे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. मलिकांच्या आरोपावर कंबोज म्हणाले होते की, मी अनेक वर्ष राजकारणापासून अलिप्त आहे. माझ्या मेव्हण्यावर मलिकांनी जे आरोप केले त्याचे पुरावे द्यावेत , आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायचा तयार आहोत. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. मलिकांनी केलेल्या आरोपामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली. त्यामुळे मी मलिकांवर १०० कोटी मानहानीचा खटला दाखल केला असं कंबोज यांनी सांगितले होते.