शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:17 AM2019-10-01T03:17:40+5:302019-10-01T03:17:54+5:30

शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता गती आली आहे.

The Shivdi-Nhavaasheva Marine Bridge project is completed at 14% | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण

googlenewsNext

- योगेश जंगम
मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता गती आली आहे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये २,२०० पीलर (पाइल कॅप) उभारण्यात येणार असून, यामध्ये आत्तापर्यंत ४४० पीलर उभारण्यात आले आहेत. सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एमएमआरडीएने मार्च, २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला तीन टप्प्यांमध्ये सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये शिवडीपासून १०.३८ कि.मी. (१०.३८ किमी), दुसºया टप्प्यामध्ये १०.३८ कि.मी. ते १८.१८७ कि.मी. (७.८०७ कि.मी.), १८.१८७ कि.मी. ते चिर्ले (३.६१३ कि.मी.) असे तीन टप्प्यांमध्ये काम करण्यात येत आहे. शिवडी ते चिर्ले असे एकूण २२ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात येईल. यात पहिल्या टप्प्यामध्ये १,२०० पीलर उभारण्यात येणार आहेत. यापैकी आत्तापर्यंत ३०० पीलर तयार झाले आहेत. दुसºया टप्प्यामध्ये ८०० पीलरपैकी १०० पीलरचे काम पूर्ण झाले आहे, तर तिसºया टप्प्यामध्ये १९० पीलरपैकी ४० पीलरचे काम पूर्ण झाले आहे. शंभर टक्के जिओ ग्राफिकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचेही एमएमआरडीएमार्फत सांगण्यात आले.

हा पूल देशातील सर्वात लांब पूल असणार आहे. एमएमआरडीएतर्फे प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी २२ किमी आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १७ हजार ८४३ कोटी रुपये इतका आहे. दोन्ही बाजूकडील जमिनीवरील पुलाची एकूण लांबी ५.५ किलोमीटर इतकी आहे. खाडीवरील पुलाची लांबी १६.५ किमी इतकी आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी येथील बीपीटीच्या जागेवर, शिवाजीनगर आणि चिर्ले या ठिकाणी एमएमआरडीएने कास्टिंग यार्ड बनविण्यात आले असून, येथे आवश्यक साधनसामग्री ठेवण्यात येणार आहे.

असा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

लांबी- २२ कि.मी
समुद्रामध्ये- १६.५ कि.मी. लांबीचा पूल समुद्रामध्ये
जमीन- ५.५ कि.मी. जमिनीवर पुलाचा भाग
प्रकल्पाचा खर्च - १७,८४३ कोटी रुपये
मार्गिका- सहा मार्गिका
पूर्ण करण्याचा कालावधी- सप्टेंबर, २०२२

शिवडी ते न्हावा शेवा अवघ्या वीस मिनिटांमध्ये : शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर, दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. या पुलावरून दरताशी शंभरच्या वेगाने प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामध्ये वाहनांसाठी सहा लेन असणार आहेत, तर एक अतिरिक्त लेन आपत्कालीन व्यवस्थेसाठी असणार आहे.

Web Title: The Shivdi-Nhavaasheva Marine Bridge project is completed at 14%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई