शिवडी रेल्वे स्थानक ठरतेय सेल्फी पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:49+5:302021-05-10T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकातील घाणीचे साम्राज्य दूर करत तिथे चित्रे रेखाटण्यात आली. त्यानंतर आता पक्षी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकातील घाणीचे साम्राज्य दूर करत तिथे चित्रे रेखाटण्यात आली. त्यानंतर आता पक्षी, होडीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही.
हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी स्थानकाच्या भिंती आणि परिसरात घाणीचे साम्राज्य होते. याशिवाय प्रवाशांवर नियंत्रण नसल्याने पादचारी मार्ग आणि स्थानकावर थुंकण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे जागोजागी अस्वच्छता होती. मात्र, स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा यांनी लॉकडाऊनपूर्वीच शिवडी रेल्वे स्थानकाची स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली. सिन्हा यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्थानकाचा कायापालट केला.
सिन्हा म्हणाले की, शिवडी रेल्वे स्थानकातील भिंतीवर विविध संदेश देणारी चित्रे काढण्यात आली आहेत. स्थानकाची दैनंदिन साफसफाई केली जात आहे. पादचारी मार्गावरील पायऱ्यांनाही विविध चित्रांद्वारे रंगवण्यात आले आहे. भिंतीवर समुद्रकिनाऱ्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे तसेच भिंतीजवळ पक्ष्यांची आणि होडीची प्रतिकृती आहे. त्यामुळे ते प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्यांच्यासाेबत प्रवासी सेल्फी घेत आहेत.
........................