मुंबई - केंद्र सरकारने सन २०२५ पर्यंत संपूर्ण देशाला क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याकरिता या रोगाचे जलद निदान व औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या (डीआरटीबी) योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक काही चाचण्या केल्या जाणार आहेत. परंतु, मुंबईत क्षयरोग रुग्णांना डीआरटीबी निदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात केवळ जे.जे. रुग्णालयात प्रयोगशाळा आहे. त्यामुळे जीटीबी रुग्णालयातील प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
शिवडी क्षयरोग रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज ५० ते ६० रुग्ण दाखल होत असतात. मात्र, मुंबईतील डीआरटीबी रुग्णांचा भारत जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे क्षयरोग रुग्णांना डीआरटीबी निदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवडी येथील जीटीबी व चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय या दोन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. क्षयरोग जंतूंची आश्वासक गुणवत्ता नियंत्रित कृत्रिम वाढ आणि औषधांची संवेदनशीलता चाचणी येथे केली जाणार आहे.
मात्र, डीआरटीबी रुग्णांची वेळीच चाचणी व जलद निदान होण्यासाठी शिवडी येथील प्रयोगशाळा अद्ययावत करणे गरजेचे आहे. ही प्रयोगशाळा जीटीबी क्षयरोग रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीत तळमजल्यावर आहे. या प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यास टीबी व ड्रग रेझिस्टंट टीबी या संसर्गजन्य साथीच्या रोगाचे लवकर व जलद निदान होण्यास मदत होणार आहे. ही प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी महापालिकेने दोन कोटी २८ लाख १८ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
* शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
* या रुग्णालयात दररोज अंदाजे १०० ते १५० रुग्णांसाठी २४ तास बाह्यरुग्ण विभाग तसेच औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग चालवण्यात येतो.
* रुग्णालयात दररोज ५० ते ६० रुग्ण दाखल होत असतात. मुंबईत दरवर्षी एमडीआर टीबी रुग्णांची सुमारे चार हजार प्रकरणे नोंदवली जातात.