मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. मात्र, याच सोशल मीडियातून राजकीय वादाचा इशारा देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखल दिला जात आहे. शिवसेना नेत संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.
देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय. तर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विट करुन शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनीही सोशल मीडियातून महाराजांना अभिवादन केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी अभिवादन करताना, भाजपला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. तर, भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊत यांच्या ट्विटनंतर शिवाजी महारांजासमवेतचा फोटो शेअर करत, शिवरायाचं एक वाक्यही लिहिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी एकमेकांवर शाब्दीक वार करण्यात आल्याचे या नेतेमंडळींच्या ट्विटमधून दिसून येत आहे.