मुंबई : चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत असल्याने यंदाच्या उत्सवात विविध उपक्रम आयोजित करणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या शतक महोत्सवी वर्षात कला दिग्दर्शक नितीशकुमार यांच्या संकल्पनेतून नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येत आहे.
मुख्य प्रवेशद्वारावर ७५ फूट उंचीचे शिवलिंग तयार करण्यात येत असून त्या शिवलिंगावर मंगल कलशातून जलाभिषेक होणार आहे. त्यामुळे यंदा हा देखावा गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. यंदा चिंतामणीची गणेशमूर्ती विजय खातू यांच्या संकल्पनेतून त्यांची कन्या रेश्मा विजय खातू यांनी साकारली आहे.मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना चिंतामणीभक्तांना निश्चितच आनंद होईल, असे मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले आहे.
पशुपतीनाथ मंदिराचा देखावा.या सजावटीविषयी सांगताना कामत यांनी सांगितले की, या देखाव्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत. यंदाचा उत्सव मंडळ आणि गणेशभक्तांसाठी विशेष असून तो स्मरणात राहण्यासाठी विविध पातळीवर मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
श्रींच्या आगमनासाठी मुंबापुरी झाली सज्जमुंबई : अवघ्या मुंबापुरीला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरांत गणेशाच्या आगमनासाठीची तयारी वेगाने सुरू आहे. विशेषत: गणेशोत्सवादरम्यान भक्तांची काही गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकाही वेगाने कामाला लागली असून, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह प्रशासनाकडून ठिकठिकाणी पाहणी करण्यात येत आहे.श्री गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने चौपाट्यांसह गणेश विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनी युक्त उत्तम अशी व्यवस्था केली आहे. गणेशाच्या आगमनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे. या सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत, गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून चौपाट्या व विसर्जन स्थळांची पालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे. याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले की, श्री गणेशोत्सव हा भव्य स्वरूपात तसेच सुनियोजितरीत्या साजरा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन कार्य करीत असते.मुंबईतील गणेशोत्सव बघण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे येत असून त्यांच्यासाठी गतवर्षीप्रमाणे सर्व सुविधांनीयुक्त सुसज्ज मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.सुरक्षा कवचसार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना अपघात, घातपात, बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला झाला, नैसर्गिक आपत्ती आली, गणरायाची आभूषणे अथवा दानपेटीतील रकमेची चोरी झाली किंवा बाप्पाच्या प्रसादातून भाविकांना विषबाधा झाली तर विम्याचे संरक्षण घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीकांत बडद यांनी दिली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या मंडपात वापरण्यात येणारी वीज उपकरणे उत्तम दर्जाची असावीत, असे आवाहन बेस्टसह उपनगरात वीजपुरवठा करत असलेल्या अदानी, टाटा आणि महावितरण यांनी केले आहे.