ठाणे – अल्पावधीतच सांस्कृतिक विश्वात मानाचे स्थान निर्माण करणारा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या भव्य अशा शिवमंदिराला साक्षी ठेवून रंगणाऱ्या, चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्सच्या या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या पर्वात कैलाश खेर, उषा उत्थुप, महेश काळे आदी नामवंत कलाकार, रवींद्र साळवे, प्रमोद कांबळे, श्रीकांत जाधव यांसारखे प्रख्यात चित्रकार, शिल्पकार आपल्या कलेने या कलासोहळ्याला उंची प्राप्त करून देणार आहेत.
कालौघात हरवत चाललेल्या शिवमंदिराच्या वारशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून २०१५ साली शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची सुरुवात झाली. सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे शिवमंदिरासारख्या प्राचीन, अभिजात वास्तूची हानी होत असल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. डॉ. शिंदे यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे श्री. ठाकरे यांच्या प्रेरणेने या वास्तूचे जतन करण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची सुरुवात केली आणि बघता बघता शिवमंदिराचे रुपडे पालटले. त्याचबरोबर, अंबरनाथवासीयांना देखील आपला स्वत:चा असा एक हक्काचा सांस्कृतिक महोत्सव मिळाला.
पंडित जसराज, हरीहरन, शिवमणी, साबरी बंधू, राहुल देशपांडे, अवधुत गुप्ते, रूपकुमार राठोड, सोनाली राठोड, बेला शेंडे, सलिम–सुलेमान, बेला शेंडे, भगवान रामपुरे, सुहास बहुलकर, अच्युत पालव, विजयराज बोधनकर अशा अनेक नामवंत कलावंतांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला चारचांद लावले आहेत. आपल्या दमदार आवाजाने आणि आगळ्यावेगळ्या गायन शैलीने लक्षावधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या उषा उत्थुप यांच्या सादरीकरणाने यंदाच्या फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी महेश काळे आणि त्यांचे साथीदार नाट्यसंगीत, सुगमसंगीत, शास्त्रीय संगीत आणि फ्युजन यांच्या बहारदार आविष्काराने उपस्थितांचे मनोरंजन करणार असून रविवार, १८ फेब्रुवारी रोजी कैलाश खेर यांच्या ‘कैलासा’ने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
याखेरीज दिनानाथ दलाला, जिव्या सोमा म्हशे, जी. एन. जाधव यांसारख्या जगद्विख्यात चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून शिल्पकार प्रमोद कांबळे आणि चित्रकार रवींद्र साळवे व श्रीकांत जाधव चित्रकला आणि शिल्पकलेची थेट प्रात्यक्षिके रसिकांना दाखवणार आहेत. त्याचप्रमाणे, मिसळ महोत्सव हे देखील यंदाच्या महोत्सवाचे एक वेगळे आकर्षण असणार आहे.