अरबी समुद्रातील शिवस्मारक हे जगातले सर्वात उंच स्मारक असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 09:58 AM2018-07-02T09:58:57+5:302018-07-02T09:59:29+5:30
आमदार मेटे यांच्या नावाची इतिहास सुवर्णअक्षराने नोंद होणार असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काढले.
- मनोहर कुंभेजकर
शिवस्मारकाची मूळ संकल्पना आमदार विनायक मेटे यांची आहे. त्यामुळेच तर त्यांच्याकडे शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद सोपविले आहे. मुंबईतील अरबी समुद्रात होणारे हे जगातले सर्वात उंच शिवस्मारक होणार असून त्यामुळे स्मारकाबरोबरच आमदार मेटे यांच्या नावाची इतिहास सुवर्णअक्षराने नोंद होणार असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काढले. 1996 पासून माझे आणि आमदार विनायक मेटे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मागच्या दहा वर्षात तर आम्हा दोघांमध्ये घट्ट अशी मैत्री झाली, मराठा आरक्षणाच्याबाबत मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यापर्यंत आमदार मेटेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील दादरच्या स्वामी नारायण मंदिर सभागृहात त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की आमदार मेटे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला, त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी नेहमीच लढा दिला आणि अजूनही देत आहेत. आघाडीने आरक्षण जाहीर केले असेल पण ते न्यायालयात टिकू शकले नाही, याला एकमेव आघाडीचे सरकारचं जबाबदार आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेटेंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
मराठा समाजाचा कोणताही प्रश्न असो त्यावेळी आमदार मेटे आक्रमक असतात,हे सातत्याने दिसून आले आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे या समाजाला आमचेच सरकार आरक्षण देणार, असे ठाम प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, की आम्ही दोघांनी पहिल्यापासून सामाजिक ऐक्याची भूमिका घेतलेली आहे. जेव्हा ते मराठा महासंघात होते, तेव्हा मी एक दलित पंत्थरचा कार्यकर्ता होतो, त्यामुळे मी त्यांना तेव्हापासून अगदी जवळून ओळखत आहे, त्यांनी नेहमीच मराठा समाजाचे प्रश्न सोडविले, सोडवित आहेत आणि सोडवत राहतील, असा विश्वासही यावेळी आठवलें यांनी व्यक्त केला. महादेव जानकर म्हणाले की, आतापर्यंत मराठा समाजाचे जे जे प्रश्न सुटले त्यामध्ये आमदार मेटे यांचे योगदान मोठे आहे. या समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही मागच्या निवडणूकीत एकत्र आलो,त्याचप्रमाणे येत्या 2019 लाही एकत्र राहू आणि सत्ता आणून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात आमदार विनायक मेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितीत मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी सत्काराला उत्तर देतांना आमदार मेटे म्हणाले की,मी पदाचा भूखेलेला नाही, कुठल्याही पदाची मी कधी आस धरलेली नाही.1981 पासून आण्णासाहेब पाटील यांचीशी माझे संबंध होते. पुढे त्यांच्या विचारांचा मी पाईक झालो, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध पाऊले उचलली, तेंव्हापासून मराठा समाज आणि समाजाच्या आरक्षणासाठी मी कालही, आजही आणि उद्याही शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे. भाजप सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे आरक्षणाचा हा मुद्दा सोडविण्यासाठी ओबीसीमध्ये दोन वर्ग करावेत, पहिल्या ओबीसीला ‘अ’ गटात आणि मराठा समाजाला ‘ब’ गटात सहभागी करून आरक्षण (पहिल्या ओबीला धक्का न लावता) द्यावे, नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी माझा कधीही मराठा आरक्षणाला विरोध नव्हता आणि पुढे राहणारही नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आमच्या विरोधात कुठलाही ओबीसी नाही, असे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत असल्याचे मत मेटे यांनी व्यक्त केले.
यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने अनेक मान्यवर व आमदार मेटे यांच्या चाहत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.