Join us

अटलसेतूवरून आजपासून शिवनेरी बससेवा; मुंबई-पुणे प्रवासात एक तासाची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 9:38 AM

मुंबईहून रस्तामार्गे पुणे गाठायचे म्हणजे दिव्य असते.

मुंबई : मुंबईहून रस्तामार्गे पुणे गाठायचे म्हणजे दिव्य असते. मुंबईतील वाहतूककोंडीतून मार्ग काढत पुणे गाठण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला साधारणत: चार ते साडेचार तास लागतात. मात्र, आता अटल सेतूवरून हा प्रवास अतिजलद होणार असून, प्रवासात किमान एक तासाची बचत होणार आहे. एसटी महामंडळ आज, २० फेब्रुवारीपासून अटल सेतूवरून पुणे ते दादर आणि पुणे ते मंत्रालय शिवनेरी बस चालविणार आहे.

नव्याने सुरू झालेल्या अटल सेतूवरून बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. सध्या पनवेल ते मुंबई या प्रवासादरम्यान गाड्या वाशी, मानखुर्द, चेंबूरमार्गे दादर येथे दाखल होतात. मात्र, सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास या मार्गावर कायमच गर्दी पाहायला मिळते. त्यातून वाहनांना कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातून प्रवाशांना विलंबाचा फटका बसून पनवेल ते दादर हे अंतर पार करण्यासाठी सव्वा ते दीड तासाचा वेळ लागतो. मात्र, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून अटल सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईत येणे शक्य असल्याने प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होत आहे. त्यातून या मार्गावरून बस सेवाही सुरू केली जावी, अशी मागणी केली जात होती.

त्याच धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर पुणे स्टेशन ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या दोन मार्गावर शिवनेरी बससेवा सुरू केली जात आहे. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल, न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय आणि दादर येथे पोहोचतील. तसेच याच बस सकाळी ११:०० आणि दुपारी १:०० वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघून पुण्याला जातील. या सेवेमुळे गर्दीच्या वेळी प्रवासाच्या वेळेत सुमारे एक तासाची बचत होणार असल्याचे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे. अटल सेतूवरून बस चालविण्याबाबत ७ आणि ९ फेब्रुवारीदरम्यान एसटी महामंडळाने प्रवासी सर्वेक्षण केले होते.

आरक्षण करण्याची सुविधा

शिवनेरी बस अटल सेतूवर धावणार असल्या तरी त्यांच्या तिकीट दरात एसटी महामंडळाने कोणताही बदल केलेला नाही.

या मार्गावर प्रवासासाठी प्रवाशांना एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन ॲपवर आणि एमएसआरटीसीच्या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधाही एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

बस सुटण्याच्या वेळा

            पुणे स्टेशन ते मंत्रालय : सकाळी ६:३० वाजता

            स्वारगेट ते दादर : सकाळी ७:०० वाजता

            मंत्रालय ते पुणे स्टेशन : सुटण्याची वेळ सकाळी ११:०० वाजता

            दादर ते स्वारगेट : दुपारी १:०० वाजता

तिकिटांचे दर काय?

स्वारगेट ते दादर

५३५ रुपये

पुणे स्टेशन

ते मंत्रालय

५५५ रुपये