Join us

स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी धावणार; अटल सेतूमार्गे प्रवास जलद होणार

By सचिन लुंगसे | Published: June 18, 2024 6:49 PM

पुणे ते दादर असा अटल सेतूवरून प्रवास करणा-या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती.

मुंबई - मंत्रालयातील कामांव्यतीरिक्त इतर कामांसाठी मुंबई ते पुणे असा प्रवास करणा-यांसाठी एसटी महामंडळाने स्वारगेट - मंत्रालय - स्वारगेट अशी शिवनेरी बस सेवा मंगळवारपासून सुरु केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस सेवा धावणार असून, या शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार आहे.मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर ब-यापैकी कमी झाले असून, आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत. पुणे ते दादर असा अटल सेतूवरून प्रवास करणा-या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. पुणे गाठण्यासाठी रेल्वे असली तरी तुलनेने ही सेवा अपुरी पडत असल्याने मंत्रालयीन कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वागरगेट सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरु करण्यात आली आहे.सोमवारी मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी नोकरीसाठी तसेच सर्व सामान्य नागरिक आपल्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. त्यांना थेट मंत्रालयात सोडणारी कोणतीही दळणवळण सेवा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. एसटीने सुरू केलेल्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालयात व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे.

सोमवारी / स्वारगेट - मंत्रालय / सकाळी ६ वाजताशुक्रवारी / मंत्रालय - स्वारगेट / सायंकाळी ६.३० वाजता

महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात ५० टक्के सवलत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत आहे.

किती आहे तिकीटफुल - ५६५हाफ - २९५