Join us

शिवराय हे स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे पहिले जाणते राजे होते : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:13 AM

मुंबई : बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून प्रचंड शौर्य धैर्याच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे ...

मुंबई : बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून प्रचंड शौर्य धैर्याच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे पाहिले जाणते राजे होते, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंतीनिमित्त बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी रामदास आठवले यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे द्रष्टे राजे होते. त्यांच्या राज्यात जनतेच्या भाजीच्या देठालाही सैनिक हात लावीत नसत. शिवराय हे प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांच्या राज्यात जर कोणी महिलेचा विनयभंग केला, तर त्याचे हात-पाय तोडून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात होती. त्यामुळे महिलांना सन्मान आणि संरक्षण मिळत होते. तशीच शिक्षा आताच्या काळात केल्यास महिलांवरील अत्याचार थांबले जातील, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श मानले होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत शौर्य धैर्य पराक्रमवीर होते. आदर्श राजा होते. गनिमी कावा हे तंत्र जगात सर्वप्रथम शिवरायांनी सुरू केले. आपल्या पराक्रमाच्या बळावर अनेक किल्ले गड जिंकले. त्यांनी नविक दल उभारले; समुद्रदुर्ग उभारले. अलिबाग येथे जहाज बांधणीचा कारखाना काढून नाविकदल मजबूत केले त्यातून त्यांची दूरदृष्टी कळते, असे आठवले म्हणाले.