मुंबई - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. गुरुवारी मुंबईत पत्रकारांना संबोधित करताना शिवराज चौहान म्हणाले की, जेव्हा कोणतं जहाज पाण्यामध्ये बुडत असतं तेव्हा त्याचा कॅप्टन शेवटपर्यंत जहाज वाचविण्याचा प्रयत्न करतो मात्र काँग्रेस हे असं बुडणारं जहाज आहे, ज्याचा कॅप्टन सर्वात आधी पळून जाण्याचा प्रयत्न करतोय अशा शब्दात त्यांनी टीका केली.
यावेळी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, एखादं जहाज समुद्रात बुडत असेल तर कॅप्टन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो. इतरांनी उड्या मारल्या तरी कॅप्टन शेवटपर्यंत उभा राहत जहाजाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. काँग्रेस हे असं बुडणार जहाज आहे ज्याचा कॅप्टन सर्वात आधी पळ काढतो. चौकीदार चोर है नारा लावला आणि पळाले, आज ते काँग्रेस अध्यक्षपदी राहू इच्छित नाही. गांधी कुटुंब काँग्रेसवर एक ओझं बनून राहिले त्यामुळे काँग्रेस बुडणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा संघटनेच्या विस्तारासाठी सज्ज झाली असून सदस्यता अभियानामार्फत भाजपा समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, प्रगत, मागास, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना पक्षाबरोबर जोडून घेईल असंही शिवराजसिंह चौहान म्हणाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रणनिती आणि पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांचे परीश्रम यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीत असाधारण व अभूतपूर्व सफलता मिळाली. तथापि, या सफलतेमुळे पक्ष संतुष्ट नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, केरळ अशा राज्यांत पक्षाचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. तसेच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विजयाचे मताधिक्य वाढवायचे आहे आणि महायुतीला 220 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा संघटनेचा नव्याने विस्तार करण्याची मोहीम सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितले.