शिवराज्याभिषेक चित्ररथः नितीन देसाई श्रेय लाटताहेत, मेहनत करणारे वेगळेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:16 AM2018-01-25T02:16:55+5:302018-01-25T10:28:12+5:30

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येते. महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ यंदा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारला आहे.

 Shivrajyabhishek Chitrath Shreya Due to controversy, social media overwhelming discussion | शिवराज्याभिषेक चित्ररथः नितीन देसाई श्रेय लाटताहेत, मेहनत करणारे वेगळेच?

शिवराज्याभिषेक चित्ररथः नितीन देसाई श्रेय लाटताहेत, मेहनत करणारे वेगळेच?

Next

मुंबई : दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येते. महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ यंदा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारला आहे. त्यानिमित्ताने विविध माध्यमांवर आणि दिल्लीतही नितीन देसाई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे; परंतु चित्ररथाची संकल्पना, त्यासाठी काम करणारे विविध कलाकार यांना डावलून नितीन देसाईच चित्ररथाचे संपूर्ण श्रेय घेत असल्याच्या आशयाचे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे चित्ररथावरून कलाकारांमध्ये श्रेयवाद सुरू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे. चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते साकारण्यापर्यंत अनेक कलाकारांनी मेहनत केली आहे. अशा कलाकारांना प्रसिद्धीपासून दूर ठेवले जात असल्याचे सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे.
जे. जे. स्कूल आॅफ अ‍ॅप्लाइड आर्ट्सचे माजी डीन मं. गो. राजाध्यक्ष यांच्या नावाने सोशल मीडियावर हे मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यानुसार चित्ररथाची संकल्पना, बांधणी, उभारणी ही नितीन देसाई यांनी केली आहे. मात्र, चित्ररथाची मूळ संकल्पना जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे माजी प्राध्यापक नरेंद्र विचारे यांची आहे. विचारे यांच्यासह अन्य कलाकारही त्यात सहभागी असल्यामुळे प्रा. विचारे आणि अन्य कलाकारांनाही त्याचे श्रेय मिळायला हवे. याबाबत मं. गो. राजाध्यक्ष यांना विचारणा केल्यानंतर राजाध्यक्ष यांनी सांगितले की, हे मेसेजेस मी पाठवलेले नाहीत.
वाद नव्हे हे तर टीमवर्क-
प्रा. नरेंद्र विचारे याबाबत म्हणाले, राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने विविध कलाकारांना शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेवर आधारित स्केच तयार करण्यास सांगितले होेते. त्यानुसार, नितीन देसाई, जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे प्रा. सकपाळ, विनोद गुरुजी आणि माझी दोन स्केचेस मिळून एकूण पाच स्केचेस संचालनालयासमोर सादर करण्यात आली.
त्यापैकी माझे स्केच संचालनालयाने निवडले. त्यानंतर, स्केचनुसार चित्ररथ तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर, चित्ररथ साकारण्याचे कंत्राट देसाई यांना मिळाले आणि माझी चित्ररथाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञ पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मला फोन येत आहेत की, नितीन देसाई या प्रकरणी सर्व श्रेय घेत आहेत. अशा वेळी तुम्ही गप्प का, माझ्या मते हे टीमवर्क आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. याअगोदर एकदा अशाच वादांमुळे महाराष्टÑाला ही स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. दरम्यान, नितीन देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title:  Shivrajyabhishek Chitrath Shreya Due to controversy, social media overwhelming discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.