'राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?', नाराज शिवसैनिकांची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:32 AM2018-02-12T10:32:59+5:302018-02-12T11:35:36+5:30
शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधीच पोस्टरबाजी केली आहे.
मुंबई : शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधी पोस्टरबाजी केली आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पद दिल्यानं शिवसैनिकांनी उघडउघड आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी पोस्टरद्वारे विचारला आहे.
ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी पोस्टरबाजी केली आहे. शिवाय, 'शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी पोस्टरबाजीद्वारे मांडली आहे.
शिवसैनिकांच आपापसात भिडले
शिवसेनेतील नवीन नियुक्त्यांवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. शाखाप्रमुख पदावरुन दोन गटातील शिवसैनिकांचा राडा झाला. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर शिवसैनिकांचा राडा झाला. या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली.
शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांचे समर्थक आपापसात भिडले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची घोषणा करुन हिंमतीने लढण्याची भाषा केलेली असताना, तर दुसरीकडे शिवसैनिकच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे यावेळी पाहायला मिळाले.