मुंबई - राज्यात सत्तांतर घडवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारसंघावर भाजपानं लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात प्रामुख्याने वरळी मतदारसंघाचा समावेश होता. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंना मागील वेळी विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांच्याजागी तिकीट दिले होते. आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने प्लॅन आखत थेट विरोधातील तगडा उमेदवार सचिन अहिर यांना शिवसेनेत आणलं. मात्र हाच मतदारसंघ ताब्यात मिळवण्यासाठी भाजपा रणनीती आखत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने वरळी मतदारसंघात विविध कार्यक्रम हाती घेतले. त्यात दहिहंडी असो वा नवरात्रौत्सव, आता दिवाळी निमित्त मुंबई भाजपाच्या वतीने वरळीच्या जांबोरी मैदानात भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपातर्फे 'आपला मराठमोळा दीपोत्सव' कार्यक्रम १९ ते २३ ऑक्टोबर २०२२ या काळावधीत जांबोरी मैदानात भरवण्यात येत आहे.
याबाबत भाजपा मुंबईनं ट्विट करत यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात,ढंगात साजरी करायची आहे.आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे त्यासाठी सर्व मुंबईकर जनतेने या कार्यक्रमाला हजेरी लावावी यासाठी आमंत्रण दिले आहे.
नवरात्रौत्सवात मराठी दांडियाचं आयोजनआगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपानं मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने मराठी कट्टा हा पक्षाकडून उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचसोबत दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. यंदा प्रथमच भाजपाकडून काळाचौकी परिसरात मराठी दांडिया आयोजित केला होता. लालबाग, परळी, शिवडी या भागात मराठी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे या परिसरात भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत.
वरळीत ठाकरेंचं वर्चस्ववरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहे. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. तर वरळी परिसरातच राहणारे सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. या परिसरातील खासदार शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा याच परिसरातील आहेत. शिवसेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक वरळीतच राहतात. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाचं वर्चस्व आहे.