बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हे उद्या राजभवनही मागतील; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:17 PM2018-11-22T14:17:46+5:302018-11-22T14:22:47+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अजोय मेहता यांच्याबरोबर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज महापौर बंगला मागतायत, उद्या राज भवन मागतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही लाजिरवाणी बाब आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
शिवाजी पार्क येथील मुंबई महापालिकेच्या जिमखान्याचे आरक्षण बदलून तिथे महापौर निवासस्थान बांधण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. पण जिमखन्याच्या जागेवर आम्ही महापौर बंगला बनू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी आयुक्त अजोय मेहता यांना सांगितलं आहे. पालिका मुख्यालयात भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी या भेटीत फेरीवाल्यांचा प्रश्नही उपस्थित केला आहे. मनसेने आंदोलन केल्यानंतर रेल्वेच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पालिका अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसवत आहेत. या फेरीवाल्यांना हटविले नाही तर आंदोलन करू, असे पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर त्यांनी सांगितले.
अधिकारीही हायकोर्टाचे आदेशही आता धुडकावून लावायला लागले आहेत, यासाठीची मी आयुक्तांना भेटलो आहे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन केलं आहे. एका फेरीवाल्यानं महापालिकेच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरक्षारक्षकांनी वेळीच रोखल्यानं त्यांचा जीव बचावला आहे.