शिवसैनिकांची कान धरून माफी मागत शिशिर शिंदेंनी बांधलं शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 05:18 PM2018-06-19T17:18:51+5:302018-06-19T17:18:51+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते शिशीर शिंदे आज'स्वगृही' परतले आहेत.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते शिशीर शिंदे आज'स्वगृही' परतले आहेत. आज मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर शिंदे शिवबंधनात बांधले गेले.
स्वगृही परतताना शिशिर शिंदे भावनिक झाले होते. यावेळी बोलाताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही क्लीप व्हायरल होत आहेत. पण त्याबद्दल शिवसैनिकांची कान धरून माफी मागतो असं म्हणत आपल्याला माफ करावं अशी विनवणीही शिंदेंनी यावेळी केली.
पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेत दाखल झालो होतो तेव्हा एका हाती झेंडा आणि एका हातात धोंडा घेतला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली ती खूप भावनिक होती. उद्धव ठाकरेंचा हात हातात घेतला तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला आता हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हाता धोंडा घेऊन कामाला लागणार आहे.
उद्धव ठाकरेंची चौफेर टीका -
राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये पुणेरी नव्हे तर फुले पगडीचा वापर करा, असे सांगितले होते. यावरून विरोधकांनी शरद पवार यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. टिळक किंवा फुले हे पगड्यांमुळे मोठे झाले नाहीत. तर त्यांच्यामुळे या पगड्या मोठ्या झाल्या. केवळ डोक्यावर पगडी घालून लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुलेंसारख्या लोकांचे विचार डोक्यात शिरणार नाहीत. तुम्हाला लोकमान्यांची पगडी नको, पण इफ्तारची 'टोपी' कशी चालते?, असा सवालही उद्धव यांनी विचारला. तसेच राजकारणासाठी स्वत:ची डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या नको, असे आवाहन करत त्यांनी शरद पवार यांनी टोला लगावला.