Join us

'मी तुमच्या ह्रदयात आहे'... दसरा मेळाव्यातील 'त्या' भाषणाने शिवसैनिक गहिवरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 11:03 AM

बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना - मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत - देत राहतील.

ठळक मुद्दे2012च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली होती. 'मी आता तुमच्यासोबत नसलो तरी माझं मन मी कुणाला दिलं नाही. मी तुमच्या ह्रदयात आहे', हे त्यांचे थकलेले उद्गार सगळ्यांनाच चटका लावून गेले होते.बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना - मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत - देत राहतील.

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून, विचारांतून शिवसैनिकांना, मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 2012च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली होती. या भाषणाने शिवसैनिक गहिवरला होता. 

'मी आता तुमच्यासोबत नसलो तरी माझं मन मी कुणाला दिलं नाही. मी तुमच्या ह्रदयात आहे', हे त्यांचे थकलेले उद्गार सगळ्यांनाच चटका लावून गेले होते. त्यानंतर, 17 नोव्हेंबर 2012 च्या दुपारी बाळासाहेब ठाकरे गेल्याची बातमी आली आणि तमाम शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. त्यांचा गॉड, गाईड, फिलॉसॉफर कायमचा निघून गेला होता. अर्थात, बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना - मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत - देत राहतील.

बाळ केशव ठाकरे... प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव... अन्यायकारक रुढी-परंपरांविरोधात, जातिभेदांविरोधात वडिलांनी पुकारलेला लढा बाळ ठाकरे यांनी अगदी जवळून पाहिला होता, तो त्यांच्या रक्तात भिनला होता. स्वाभाविकच, घरातील प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचं व्रत त्यांनी अंगिकारलं. त्यातूनच जन्माला आली शिवसेना आणि मग बाळ ठाकरे लाखो शिवसैनिकांचे बाळासाहेब होऊन गेले. आज निधनानंतरही ते हिंदूहृदयसम्राट म्हणून लाखो हृदयांमध्ये जिवंत आहेत आणि राहतील. देशातीलच नव्हे, तर जगातील काही मोजक्या व्यंगचित्रकारांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदराने घेतलं जातं. व्यंगचित्रकार म्हणूनच त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती.

महाराष्ट्रावरचं आक्रमण, अन्याय मराठी माणूस सहन करणार नाही, अशी डरकाळी फोडत बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. हे नाव त्यांना प्रबोधनकारांनीच सुचवलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्रभर फिरून, दणदणीत सभा घेऊन, खणखणीत भाषणं करून बाळासाहेबांनी आपले मावळे जमवले होते. राज्यभर शिवसेनेच्या शाखा सुरू करून 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारणाचं सूत्रं स्वीकारलं होतं. या सूत्रानेच शिवसेनेला सत्तासिंहासनावर नेऊन बसवलं आणि त्याचा 'रिमोट कंट्रोल' बाळासाहेबांच्या हाती दिला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

जातीपातींमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं, भाषेबद्दल अभिमान बाळगण्याचा मंत्र दिला, संकटसमयी मदतीला धावून जाण्याची शिकवण दिली, ते गिरणी कामगारांचे सुरक्षा कवच झाले, मुंबईतील दंगलीच्या वेळी बाळासाहेबांचा सैनिक हा हिंदूंचा - मराठीजनांचा आधार झाला होता. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणांनी राजकारणाला नवी दिशा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत युती करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता. त्याचं गोड फळ शिवसेना आणि भाजपाला 1995 मध्ये मिळालं होतं, विधानसभेवर भगवा फडकला होता. पण, सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहून बाळासाहेबांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं होतं. 

 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईदसरा