शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक
By महेश गलांडे | Published: April 5, 2024 07:53 PM2024-04-05T19:53:55+5:302024-04-05T20:20:35+5:30
ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा.
महेश गलांडे
मुंबई - धाराशिव म्हणजेच उस्मानाबादलोकसभा मतदारसंघ हा तसं पाहिला तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सुरुवातीपासूनच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस खासदारानेच येथील प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांनी सगल ४ वेळा विजय मिळवत मतदारसंघात काँग्रेसचंच वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं. मात्र, सन १९९६ साली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या एका शिवसैनिकाने सुरूंग लावला. तेव्हापासून उस्मानाबादलोकसभा मतदासंघात शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिलं आहे. मात्र, २८ वर्षात प्रथमच यंदाच्या निवडणुकीत येथील धनुष्यबाण गायब झाला आहे. उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी सातत्याने शिवसेनेनं केली, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं ते स्वप्न पूर्णही झाले. पण, धाराशिव झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण गायब झालाय.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. त्यानंतर, राष्ट्रवादीतही फूट पडल्यांतर अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांत जागावाटपात साहजिकच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. कारण, धनुष्यबाण चिन्हा निवडणूक लढवणारे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाकरेंकडे धनुष्यबाण चिन्हच राहिले नाही. याउलट ठाकरेंच्या हाती मशाल चिन्ह देण्यात आले. त्यामुळे, शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या उस्मानाबादमध्ये यंदाची निवडणूक मशाल चिन्हावर लढली जात आहे. उस्मानाबादला धाराशिव बनविण्याचं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं, उस्मानाबादचं धाराशिवही झालं. पण, यंदाच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये शिवसैनिकांसाठी धनुष्यबाण दिसणार नाही.
शिवसैनिकांना वेदना
ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा. सायकल, रिक्षा, जीपगाड्या आणि आता महागड्या गाड्यांमधूनही प्रचार होऊ लागला. त्यासाठी, गळ्यात धनुष्यबाण चिन्हाचा गमछा, खिशाला कागदी बिल्ला, मोठमोठे कटाऊट, स्टीकर आणि धनुष्यबाण चिन्ह सर्वत्र झळकलं जायचं. दिसला बाण की मार शिक्का... अशीही घोषणा व्हायची. मात्र, यंदाच्या निवडणुकीत धाराशिवमधून धनुष्यबाणच गायब झाला आहे. शिवसेनेच्या वादात ह्या मतदारसंघातील ईव्हीएम मशिनवर यंदा धनुष्यबाणाचे चिन्ह दिसणार नाही. त्यामुळे, निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांच्या मनात हूरहूर लागली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी म्हणून... ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सभांची सुरुवात व्हायची, त्याच तुळजाभवानी मातेच्या धाराशिव जिल्ह्यात यंदा बाळासाहेबांचा धनुष्यबाण नसल्याच्या वेदना शिवसैनिकांच्या मनात आहेत.
काँग्रेसचं सर्वाधिक वर्चस्व
१९५२ ते १९९१ याकाळात झालेल्या ९ लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं. याकाळात राघवेंद्र दिवाण, व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील, टी.एस. श्रंगारे, टी.एन. सावंत, अरविंद कांबळे यांनी उस्मानाबादचं लोकप्रतिनित्व केलं. येथून चारवेळा खासदार राहिलेले अरविंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे रहिवासी होते. सन १९८४ साली ते पहिल्यांदा खासदार झाले, त्यानंतरही सलग तीन लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी विजय मिळवला. मात्र, १९९६ साली पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाणाने काँग्रेसला घायाळ केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात १९९६ पासून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी लोकसभेवर ताबा मिळवला. तर, महाआघाडीच्या जागावाटपात ही जागाही राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची झाली. महायुतीकडून ह्या जागेवर शिवसेनेचा हक्का राहिला. म्हणून, येथील खासदार हा धनुष्यबाण किंवा घड्याळाच्या चिन्हावरच निवडून यायचा. मात्र, यंदा धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारच दिसणार नाही.
गेल्या २५ वर्षांचा राजकीय इतिहास
सन १९९६ साली बार्शीतील शिवसैनिक शिवाजी कांबळे हे विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या विजयाची मालिका खंडित झाली अन् उस्मानाबाद लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला. १९९८ साली झालेल्या निवडणुकीतही पुन्हा अरविंद कांबळे खासदार बनले. त्यानंतर, १९९९ मध्ये पुन्हा शिवसेनेचे शिवाजी कांबळे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर, २००४ साली कल्पना नरहिरे येथून धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या खासदार बनल्या. तर, २००९ साली राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पद्मसिंह पाटील केवळ ६,७८७ मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची परंपरा त्यांनी मोडित काढली. मात्र, पुन्हा २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र गायकवाड हे धनुष्यबाण चिन्हावर २ लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन दिल्लीला पोहोचले. २०१९ च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तिकीट देण्यात आले. ओमराजे यांनीही २०१९ ची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली अन् राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांना पराभूत करत ते १ लाख २७ हजार मतांनी विजयी झाले. त्यामुळे, शिवसेना आणि धनुष्यबाण विजयाची परंपरा गेल्या २५ वर्षांपासून कायम राहिली आहे, जी यंदाच मोडीत निघाली. कारण, यंदा धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेला ही जागा मिळाली नाही. तर, ज्या शिवसेनेला ही जागा मिळाली, त्या शिवसेनेकडे धनुष्यबाणच राहिला नाही.
दरम्यान, सन १९८४ ते २००९ पर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी राखीव होता. या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे, शिवसेनेचे शिवाजी कांबळे आणि कल्पना नरहिरे यांनी उस्मानाबादचं खासदार म्हणून नेतृत्व केलं. धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, भूम-परांडा-वाशी, कळंब आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत. तर, राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर अर्चना पाटील ह्या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, गेल्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच धनुष्यबाण चिन्हाशिवाय उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक होत आहे.