Join us

शिवसेना भवनातून आता 'रुग्णसेवेला' प्रारंभ, आदित्य ठाकरेंनी केला शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 1:09 AM

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आली.

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आजपासून 24 तास सज्ज असून सर्वोतोपरी मदतीसाठी रुग्णांनी शिवसेना भवनात संपर्क साधावा, असे आवाहन युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना भवनात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाचे व लोगोचे अनावरण झाले; त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अमेय घोले, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याच तत्वानुसार शिवसेना कार्यरत असून गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज असलेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष याचाच एक भाग असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून मायानगरी मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक गोरगरीब रुग्णाची राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते शासनाच्या विविध योजनेअंतर्गत मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया, उपचार आणि औषध पुरवठा करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आली. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सिद्धिविनायक मंदिर न्यास, टाटा ट्रस्ट आदि ट्रस्ट तथा कारो ट्रस्ट आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत 4 हजार पेक्षा अधिक रुग्णांना 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना 10% + 10% राखीव असलेल्या खाटावर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून पाठपुरावा केला गेला. धर्मादाय रुग्णालये आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आजपर्यंत 5 कोटी रुपयांहुन अधिकच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी कक्षातून समनवयाची भूमिका पार पाडली गेली. 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण 15 महाआरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून एकूण 1 लाख 10 नागरिकांची मोफत प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. या सर्व शिबिरात मिळून तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या औषधांचा मोफत वाटण्यात आली आहेत. कक्षाद्वारे पूरग्रत केरळ राज्यातील अलेपी जिल्ह्यात एकूण 5 महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 10 हजार पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करून सुमारे 1 कोटी रुपयांची औषध मोफत वितरित करण्यात आली होती. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून मंगेश चिवटे जबाबदारी सांभाळत आहेत. 

टॅग्स :शिवसेनामुंबईहॉस्पिटलआदित्य ठाकरे