मुंबई - शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता एकीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा आणि गाठीभेटींचा धडाकाच लावला आहे. अनेक वर्षांनंतर ते शिवसेना शाखेतही जाताना दिसून ये आहेत. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपा आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण करताना भाजपवर जोरदार प्रहार केला. शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला. "अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचं आहे. पण नातं जर तोडायचं असेल तर हे जे आज स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरं जा", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांनी जरा एकदा इथं पाहावं. आज इथं उपस्थित असलेले कार्यकर्ते माझी ताकद आहेत. 'वर्षा'वरुन निघालो असलो तरी मातोश्री परतल्यानंतर मला माझी खरी शक्ती मिळाली आहे. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, आज अरविंद सावंत यांना किशोरी पेडणेकरांनी गणपती बाप्पाची, मंगलमूर्ती भेट म्हणून दिली. गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. मी गणरायाकडे साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. हिंदुस्थानावर फडकू देत, आता खरा भगवा कोणता हे दाखवण्याची वेळ आली आहे", असंही ठाकरे यांनी म्हटलं.