- मनोहर कुंभेजकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2019 लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा पुन्हा एकदा येत्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनी करणार असल्याची शक्यता शिवसेनेतील सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. दरवर्षी 19 जूनला शिवसेनेचा वर्धापनदिन मेळावा षण्मुखानंद येथे साजरा होतो. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेनेने गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडची निवड केली आहे. यावेळी शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार असून या मेळाव्याला शिवसेनेचे राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गोरेगाव पूर्व येथील नेस्कोच्या ग्राऊंडवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे.या मेळाव्यात राज्यातील शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार,आमदार,संपर्कप्रमुख,तालुका अध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सर्व 28 महानगर पालिकांमधील नगरसेवक,मुंबईतील 12 विभागप्रमुख,सर्व उपविभागप्रमुख,227 शाखाप्रमुख असे सुमारे यावेळो उपस्थित असलेल्या 10000 हून पदाधिकऱ्यांच्या साक्षीने उद्धव ठाकरे आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, अशी घोषणा पुन्हा एकदा करतील. शिवसेनाप्रमुखांच्या गेल्या 23 जानेवारी रोजी जयंतीदिनी वरळी येथे झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत त्यांनी स्वबळावर जाहीर केलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता देखील शिवसेनेच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान येत्या 25 जून रोजी होणाऱ्या मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास उर्फ भाई पोतनीस व मुंबई शिक्षक मतदार संघातून प्रा.शिवाजी शेंडगे यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून,शिवसेनेच्या सर्व 227 शाखांमध्ये मुंबईतील 12 विभागप्रमुखांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेला विजयी करण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.शिवसेनेचे खासदार व आमदारांनी सुद्धा या निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.