Join us

नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 9:36 PM

विदर्भाच्या विकासासाठी प्रकल्पाची गरज असल्याचं उद्धव यांनी म्हटलं

मुंबई: जर मुख्यमंत्री नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. भाजप आमदार आशीष देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 'आशीष देशमुख यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव दिला आहे. मला त्यांचं कौतुक वाटतं. नाणार राहणार नाही जाणार हे आता नक्की झालं आहे. प्रकल्प गुजरातला जाण्याची भीती दाखवली जात होती. हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प नेला जावा. मुख्यमंत्र्यांनी वारंवार गुजरातची भीती दाखवू नये,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भाला त्याची गरज आहे,' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. भावनांचा अनादर करुन प्रकल्प लादणार  नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्णयाचंही कौतुल केलं. 'देसाई यांनी घेतलेला निर्णय अभ्यासपूर्ण होता. कायदे जनतेसाठी आहेत. जनता कायद्यासाठी नाही आणि आम्ही जनतेसोबत आहोत,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. प्रकल्प कोकणात होणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. 'आता हा प्रकल्प कोकणात होणार नाही. आम्ही तो घालवला आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन. विदर्भात पोकळ अधिवेशन घेऊन काहीही होणार नाही. मुंबईत बसूनही विदर्भासाठी चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पनाणार प्रकल्पउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस