मुंबई: पालघरमधील पोटनिवडणुकीत भाजपाला ईव्हीएममुळे विजय मिळाला, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि ईव्हीएमवर तोंडसुख घेतलं. पालघरचा अपवाद सोडल्यास देशभरात भाजपाच्या हाती धुपाटणंच लागलं, असा टोलादेखील त्यांनी लगावला. काल देशभरात 4 लोकसभा आणि 10 विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यातील 11 जागांवर भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं. पालघरमध्ये भाजपानं ईव्हीएमच्या जोरावर विजय मिळवला, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून शरसंधान साधलं. 'आमच्यासाठी हा निकाल म्हणजे २०१९ च्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे. पालघर आम्ही स्वतंत्रपणे लढलो. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप होणे गरजेचे होते, पण निवडणूक शिवसेना विरुद्ध भंगार ‘ईव्हीएम’ अशी झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो. शिवसेना समाधानी आहे!', असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम-दाम-दंड-भेद या विधानाचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. 'महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या, पण ‘साम-दाम-दंड-भेद’ वगैरे मस्तवाल नीतीचा वापर झाला तो फक्त पालघरमध्येच. पालघरात काँग्रेसचे नेतेच भाजपचे कमळ घेऊन जिंकले. हा विजय सोपा नव्हता. या विजयासाठी गावीत व त्यांच्या पाठीराख्यांना जो संघर्ष करावा लागला तो थक्क करणारा होता. एक तर स्वतःच्या हिंदुत्ववादी विचारांचा ‘भाजपाई’ उमेदवार शोधताना भारतीय जनता पक्षाची दमछाक झाली. त्यामुळे काँग्रेसचे भ्रष्ट राजेंद्र गावीत यांना कमळपाकळय़ांचे दुग्धस्नान करून त्यांनी पावन करून घेतले. मग त्यांना हळद लावून घोड्य़ावर बसवले. तरीही घोडा पुढे पाऊल टाकीना. तेव्हा नवरदेवाच्या वरातीतील बॅण्डबाजा पथक व नाच्यांनी संपूर्ण पालघरात पैशांचा धो धो पाऊस पाडला. पैशाने भागले नाही तेव्हा आदिवासी पाड्य़ांवर दारूवाटप केले. हा इतका सरंजाम व थाटमाट करूनही भाजपने भाड्याने घेतलेला काँग्रेसचा घोडा जागचा हलायला तयार नव्हताच. तेव्हा निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेस वरातीत उतरवले व शेवटी ‘ईव्हीएम’ची भंगार यंत्रणा हाताशी धरून काँग्रेसचे घटस्फोटितराजेंद्र गावीत यांना विजयाची वरमाला घालण्यात आली. अशा तऱ्हेने भाजपाची मेहनत फळास आली नसती तरच नवल होते. निवडणुकांचा कौल हा तसा मान्य करण्यासाठीच असतो, पण पालघरचा कौल हा ‘ईव्हीएम’ बनवाबनवीचा कौल आहे व तो कौल स्वीकारण्यास पालघरची जनताच काय तर संपूर्ण महाराष्ट्र तयार नाही,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचं पानीपत झालं. त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपावर तोफ डागली. 'कैरानात योगी म्हणवून घेणाऱ्याआदित्यनाथांचा दारुण पराभव सर्व विरोधकांनी एकत्र येऊन केला. कैरानात भाजपचे खासदार हुकूम सिंग यांच्या निधनानंतर त्यांची कन्या मृगांका सिंगला उमेदवारी दिली. त्या मृगांका सिंगही पराभूत झाल्या. मृगांका सिंग विजयी व्हाव्या म्हणून स्वतः पंतप्रधान कैरानाच्या सीमेवर ‘रोड शो’ वगैरे करीत होते. तरीही राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सुम हसन या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. उत्तर प्रदेशातीलच नुरपूर विधानसभेतही भाजपचा पराभव झाला. तेथे समाजवादी पक्षाचे नैमूल हसन विजयी झाले. सांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या महेशताला विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झाला. कर्नाटकातील राजराजेश्वरी नगर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे मुनिरथ विजयी झाले. बिहारमधील जोकीहाट मतदारसंघात लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने सत्ताधारी संयुक्त जनता दलाचा पराभव केला. झारखंड, मेघालय, केरळ विधानसभा पोटनिवडणुकाही भाजपने गमावल्या आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील पालघरमधील ‘ईव्हीएम’ने मिळवून दिलेला विजय सोडला तर भाजपच्या हाती देशभरात तसे धुपाटणेच लागले आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव भाजपावर बरसले.
पालघर सोडल्यास देशभरात भाजपाच्या हाती धुपाटणंच; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 8:24 AM