उद्धव ठाकरे आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटणार; भांडणं मिटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:28 AM2018-03-28T11:28:12+5:302018-03-28T12:07:31+5:30
उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात.
मुंबईः शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपानं काल एक पाऊल पुढे टाकलं असतानाच, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना आणि देवेंद्र सरकारमधील छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, भाजपानं टाळीसाठी हात पुढे केल्यावर उद्धवही 'शेकहँड' पुढे सरसावल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना आमदारांच्या प्रलंबित मागण्या आणि निधीअभावी रखडलेली विकासकामं याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे संध्याकाळी पाच वाजता विधानभवनात जाणार आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हळूहळू निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्यानं ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जातेय.
गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना सातत्यानं मोदी आणि फडणवीस सरकारला लक्ष्य करतेय. अगदी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देईपर्यंत त्यांच्यातील नातं ताणलं गेलं होतं. त्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बरीच शाब्दिक चकमकही रंगली होती. या पार्श्वभूमीवर, 'पुढच्या निवडणुका स्वबळावरच' ही घोषणाही उद्धव ठाकरेंनी केलीय. पण, गेल्या काही दिवसांत चित्र थोडं बदललेलं पाहायला मिळतंय. शिवसेनेशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दाखवली आहे आणि त्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेत. त्यात दोन पक्षांमधील, नेत्यांमधील दुरावा दूर होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
तिकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल दिल्लीत ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि ममतांचीही चर्चा झाली होती. त्यामुळे वेगळी बेरीज-वजाबाकीही सुरू झाली आहे.