मुंबई - "आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा", असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर, आज सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून राज्यपालांनी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र, अद्यापही बंडखोर शिवसैनिक परत येण्याची आशा शिवसेना नेत्यांना आहे. त्याबाबत, आता दिपक केसरकर यांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केली.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीवेळी केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं तरी हे सरकार पडेल, 39 लोकं तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसं बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेना नेत्यांना असलेली वेडी आशा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील मोठ्या नेत्यांना ही आशा आहे, आता यावर मी काय बोलणार? लहान मुलं अशी विधानं करू शकतात. पण, मोठी लोकंच अशी बोलायला लागली तर बघायलाच नको, अशा शब्दात दिपक केसरकर यांनी प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना स्पष्टपणेच सांगतिले.
गुवाहाटीत आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार आनंदात आहेत. हवं तर आम्ही व्हिडिओ शेअर करायला तयार आहोत, म्हणजे आमच्याकडील 39 आमदारांपैकी कुणीही शिवसेनेकडे परत जाण्याची शक्यता नाही. याउलट बहुमत चाचणीवेळी आम्ही मुंबईत येऊ, असेही केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, ती मागणी मान्य होत नसेल तर आम्ही परत येऊन काय करू. त्यामुळे, शिवसेनेत परत येण्याची आमची सर्वप्रकारची चर्चा आता संपली आहे. गुवाहटीतील काही आमदार परत येतील, ही फक्त त्यांना वेडी आशा आहे, अशा शब्दात केसरकर यांनी भूमिका मांडली.
राऊतांनी आम्हाला परत येण्यापासून रोखलं
राज्यातील सत्तासंघर्ष केव्हा संपणार आणि तुम्ही सर्व केव्हा परतणार याबाबत दीपक केसरकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं आहे. त्यांनाच विचारा, असा आरोप केला आहे. "संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं आहे. आमची कार्यालयं फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसं परतणार? संजय राऊत यांनीच आम्हाला परत येण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे आम्ही कधी परत येणार हे त्यांनाच विचारा", असं दीपक केसरकर म्हणाले.