मनोहर कुंभेजकर
मुंबई - पालिकेच्या आर उत्तर, आर मध्य व आर दक्षिण विभागात कचरा गाड्यांचा पुरवठा करण्याचे नवीन कंत्राट ठाणे येथील एजी इन्व्हारो इन्फ्राप्रोजेकट प्रा. लिमिटेड या नव्या कंत्राटदाराला गेल्या 13 नोव्हेंबरपासून दिले आहे. त्याला कामगार संघटनानी जोरदार विरोध करुन गेली 3 दिवस संप पुकारला आह. त्यामुळे कांदिवली, बोरिवली व दहिसर येथील कचरा उचलण्याची सेवा गेली तीन दिवस ठप्प झाली आहे.
दहिसरकरांना साचलेला कचऱ्याचा त्रास होऊ नये आणि येथील गेली तीन दिवस साचलेला कचरा त्वरित उचलण्यासाठी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शितल मुकेश म्हात्रे व प्रभाग क्रमांक 6 चे शिवसेना नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर हे चक्क मध्यरात्री रस्त्यावर उतरले. कंत्राटदाराला बोलावून त्याच्या डंपरने सुपरव्हायझर व डायव्हरच्या मदतीने गुरुवारी रात्री 11 ते मध्यरात्री 2 पर्यंत येथील 80 टक्के कचरा उचलण्यात आला. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. नगरसेवक रस्त्यावर आणि अधिकारी झोपले अशी बोलकी प्रतिक्रिया नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती होती त्यामुळे येथील कचरा उचलण्यास शिवसेना उतरली.
या संदर्भात आजच्या लोकमतमध्ये कांदिवली ते दहिसर भागात साचले कचऱ्याचे ढिग या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच त्याचे जोरदार पडसाद उमटले. उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेऊन याबाबतीत पालिका प्रशासनाला जाब विचारून येथील कचरा लवकर उचला अशी मागणी केली.