मुंबईः पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची भाजपाला आशा होती. परंतु जनतेनं भाजपाची ही आशाच धुळीला मिळवली आहे. त्यानंतर आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, श्री. मोदी व श्री. शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे, असं मत सामना संपादकीयमधून व्यक्त करण्यात आलं आहे.किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत, असं म्हणत सामनातून भाजपावर विखारी टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- पाच राज्यांत काय होईल याची गणिते आणि जमाखर्च मांडले जात होते. भारतीय जनता पक्षाला एकाही राज्याचे गणित धडपणे सोडवता आले नाही
- राहुल गांधी यांचा ‘पेपर’ कोरा आहे असे ज्यांना वाटत होते त्यांची गणिते कोलमडली आहेत. पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी ‘मेरिट’ म्हणजे गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला आहे.
- मोदी यांचा उदय व भाजपची विजय यात्रा ज्या राज्यांतून सुरू झाली तेथेच भाजपच्या रथाची चाके रुतली. मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे ‘चेहरा’ आहेत असा ठराव संमत झाल्यानंतर चार राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या (चूकभूल द्यावी-घ्यावी) व तेथे प्रचंड विजय मिळवून ‘हा मोदी यांचा पायगुण बरं का!’ अशा घंटा बडवण्यात आल्या.
- मोदी पंतप्रधान असतानाच याच चार राज्यांत भाजपला ‘जबर’ फटका बसला आहे. यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान हे तर भाजपचे अभेद्य गड होते व या गडांना असे खिंडार पडेल असे कुणाला वाटले नव्हते.
- छत्तीसगडमध्ये रमणसिंह हे मजबूत होते. तेथे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवून भाजपचे पानिपत केले. भाजपच्या चाणक्य मंडळाने अजित जोगी यांना फोडले व वेगळा पक्ष स्थापन करायला लावून निवडणुकीत उतरवले. ही चाणक्य नीती मोडून काढून छत्तीसगढमध्ये काँग्रेस विजयी झाली.
- मध्य प्रदेशात नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ‘मामाजी’ शिवराजसिंह चौहान यांचा चेहरा लोकप्रिय होता. भाजपचे संघटनही रुजले होते. त्यामुळे काही झाले तरी शेवटी शिवराज हे बहुमताचा आकडा गाठतील असा माहोल होता. तेथे काँग्रेसने भाजपच्या सिंहाची आयाळ धरून गदागदा हलवली आहे.
- राजस्थानात काँग्रेसचे सरकार बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तेथे काँग्रेसला 140 च्या आसपास जागा मिळतील असे वातावरण होते, पण मुख्यमंत्रीपदाच्या अंतर्गत लाथाळ्या आणि गटबाजीने काँग्रेसचा आकडा कमी केला.
- अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षाने राजस्थानात काँग्रेस पक्ष शंभर जागांच्या थोडा पुढे जाऊन थांबला. पण शेवटी त्या पक्षाचे बहुमताचेच सरकार तेथे बनणार आहे.
- तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. मिझोराममध्ये स्थानिक पक्षाने बाजी मारली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, श्री. मोदी व श्री. शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे.
- सरकारे ही फक्त निवडणुका लढवून जिंकण्यासाठीच आहेत, या देशांत भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाने टिकू नये व राहिलेच तर भाजपचे मांडलिक म्हणूनच राहावे या प्रवृत्तीचा पराभव चार राज्यांत झाला आहे.
- भाजपने आधी मित्रांना गमावले व आता महत्त्वाची राज्ये गमावली. थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही. राजस्थानात शेतकरी अडचणीत आहे. मध्य प्रदेशात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या गेल्या.
- नोटाबंदीसारख्या भंपक निर्णयाने अर्थव्यवस्था कोसळली. लोकांचे रोजगार गेले व महागाई वाढली. जनता होरपळत असताना आमचे पंतप्रधान जगाचे राजकारण करीत ‘उडत’ राहिले.
- ‘राहुल गांधी मला ‘भारत माता की जय’ बोलण्यापासून रोखत आहेत’ किंवा राममंदिर उभारणीस काँग्रेस अडथळे आणीत आहे’, अशी पोरकट विधाने त्यांनी केली. ती त्यांच्यावरच उलटली.
- नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राइक गांधी परिवारास विचारून केला नव्हता हे ते विसरून गेले. राममंदिराचे वचनही त्यांनी निभावले नाही. - जे उर्जित पटेल नोटाबंदीचे समर्थन करीत होते त्यांनीही कंटाळून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद आता सोडले. हिंदुस्थान चार-पाच व्यापारी डोक्याने चालवला जात आहे व त्यात रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था मोडल्या जात आहेत.
- पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. लोकशाहीत पैसा, ईव्हीएम घोटाळा, दहशतवादाची पर्वा न करता जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले.