विमानप्रवासात चप्पल मारहाणीमुळे चर्चेत आलेल्या खासदार रविंद्र गायकवाडांचा पत्ता शिवसेनेनं कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:34 PM2019-03-22T15:34:20+5:302019-03-22T16:21:24+5:30
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते.
मुंबई - भाजपापाठोपाठ शिवसेनेकडूनही लोकसभा निवडणुकांसाठी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबादलोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. रविंद्र गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. रविंद्र गायकवाड हे विमानप्रवासात कर्मचाऱ्यास चप्पल मारल्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते.
शिवेसनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, हिंगोली आणि उस्मानाबाद या मतदारसंघात नवीन चेहरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये, उस्मानाबादसाठी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. तर, हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यावेळी चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले होते. खासदार गायकवाड हे पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. त्यांनी आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केले होते. पण, जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले होते. गायकवाड यांच्या या प्रकरणानंतर ते देशभर चांगलेच चर्चेत आले होते. तर, एअर इंडियानेही त्यांना काही काळासाठी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली होती.
Lok Sabha Election 2019: शिवसेनेकडून 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर https://t.co/LODjZwnsXc
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 22, 2019