मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबईमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महिलेवरील बलात्काराच्या आणि हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख केला. राज्यपालांनी या घटनेवर पत्र पाठविले. ही घटना दुर्दैवी आहे. पायबंद घातला, कायदे केले तरी या घटना घडत आहेत. विरोधक यावर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर टीका करत आहेत. काही अन्य घटनांवर महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला असे भाजपाचे लोक असा गळा काढत आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनीभाजपाला केला आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Shivsena Dasara Melava) भाजपाचे राज्यातील नेते आणि केंद्रातील नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळीत त्यांनी केंद्र सरकार राज्यांवर करत असलेल्या अन्यायावरही वाचा फोडली. केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती ते एकदा समजुद्या. केंद्राएवढीच सर्व राज्यं सार्वभौम आहेत आणि राहतील, असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. राज्याला केंद्राच्या बरोबरीचे हक्क दिलेले आहेत. फक्त तीन अधिकार केंद्राला जास्त दिले आहेत. तसं होत नसेल तर घटनेची दुर्घटना होईल, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
म्हणून आज शिवसैनिक भ्रष्टाचारी झाला का? तुमची पालखी वाहत नाही म्हणून आज शिवसैनिक (Shiv Sena) भ्रष्टाचारी झाला? तुमच्या पक्षाची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. काटा कसा असतो हे एकदा बोचल्यावर कळेल तुमचं नशीब समजा अजून बोचत नाहीए अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपाला सुनावले.
कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात, असं ठाकरे म्हणाले.