Shivsena Dasara Melava 2021: ...तर राज्यात नक्कीच भाजपाचाही मुख्यमंत्री झाला असता; उद्धव ठाकरेंनी सांगितलं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:35 PM2021-10-15T19:35:06+5:302021-10-15T19:37:18+5:30
Shivsena Dasara Melava 2021: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपावर चौफेर टीका केली
Shivsena Dasara Melava 2021: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपावर चौफेर टीका केली. सत्तापिपासूपणा भाजपाचा घात करत आहे. सत्ताची नशा इतरांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते याचं भान राखलं गेलं पाहिजे, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. "मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळलं म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
"मी वडिलांना दिलेलं वचन पाळण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आलेली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मी मोठ्या हिमतीनं स्वीकारली आणि हे आव्हान मी पेललं. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाहीत. त्यामुळे तुमची आज केविलवाणी अवस्था झालीय", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपा म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी
"भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे", असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार पाडायची वक्तव्य केली जातात. हिंमत असेल तर पाडून दाखवाच. सरळमार्गानं काही होत नाही. म्हणून छापा टाकायचा आणि काटा काढायचा ही असली थेरं महाराष्ट्रात चालू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं (Shivsena Dasara Melava) आयोजन करण्यात आलं असून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आहे. यात मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित आहेत. सामान्य शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. फेसबुक लाइव्ह आणि इतर समाजमाध्यमांमधून शिवसैनिकांना दसरा मेळावा पाहता यावा याची सुविधा करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
छापा-काटा, हिंमत असेल तर पाडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपाला आव्हान
'त्यांना' भाजपचं ब्रँड ऍम्बेसेडर करा; ठाकरेंचा सणसणीत टोला; थेट जाहिरातची वाचली