Shivsena Dasara Melava 2021: 'मी पुन्हा येईन बोलणारे आता मी गेलोच नाही म्हणू लागलेत'; पहिल्याच वाक्यात उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:02 PM2021-10-15T19:02:59+5:302021-10-15T19:03:31+5:30
Shivsena Dasara Melava 2021 Updates: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोला लगावला.
Shivsena Dasara Melava 2021 Updates: शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजेच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. "मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं म्हणू लागलेत. आता तुम्ही बसा तिकडेच'', अशी जोरदार सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला.
भाजपमधील सहकाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा आणि जनतेची साथ यामुळे मी आता राज्याचा मुख्यमंत्री नाही याची जाणीव कधीच होत नाही. मी आजही मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं, असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. याच विधानाचा दाखल देत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
"माझ्यावर नम्रतेचे संस्कार तर आहेतच पण अंगावर येईल तर त्याला शिंगावर घेण्याचीही धमक आमच्यात आहे. सत्ता येईल जाईल. पण अहंपणा डोक्यात जाऊ देऊ नको हे मला लहानपणापासून सांगण्यात आलं आहे. काय लायकीची लोक आपल्याला आव्हान देतात. यांची पात्रता तरी आहे का? स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी ,सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही", असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आहे. यात मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित आहेत. सामान्य शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. फेसबुक लाइव्ह आणि इतर समाजमाध्यमांमधून शिवसैनिकांना दसरा मेळावा पाहता यावा याची सुविधा करण्यात आली आहे.