तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा घणाघात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
या देशामध्ये हिंदुत्व धोक्यात आहे का?, गृह मंत्रालयाने हिंदुत्वाला धोका नाही असे सांगितलेय. याच दिवसाची या क्षणाची वाट पाहत होतो. हिंदुत्व आता धोक्यात आले आहे. नवहिंदू उपटसुंभ यांच्यापासून हिंदुत्वाला धोका आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं (Shivsena Dasara Melava) आयोजन करण्यात आलं असून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीत मेळावा घेण्यात आला आहे. यात मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित आहेत. सामान्य शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. फेसबुक लाइव्ह आणि इतर समाजमाध्यमांमधून शिवसैनिकांना दसरा मेळावा पाहता यावा याची सुविधा करण्यात आली आहे.