Shivsena: दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 07:43 PM2022-06-25T19:43:46+5:302022-06-25T19:45:35+5:30
महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून होतं, असं मोठं वक्तव्य केलं
मुंबई - राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर या, मी राजीनामा देतो, असे म्हटले होते. त्यानंतर, आता खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी, दिपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून होतं, असं मोठं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यायला तयार आहेत का, आम्ही उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री करतो. मी ते येणारच नाहीत. या आमदारांना जेवणातून किंवा चहातून अफू आणि गांजा देत आहेत. त्या बधीरतेतूनच हे बोलत आहेत, असा घणाघाती आरोपच संजय राऊत यांनी शिंदेगटातील आमदारांवर केला आहे. तसेच, सध्या हे आमदार भारतीय जनता पक्षाचे बंदी आहेत, कैदी आहेत. या आमदारांना भाजपकडून स्क्रीप्ट दिली जात आहे, असेही ते म्हणाले. दिपक केसरकरांनी महाराष्ट्रात न येण्याचं कारण देताना तुमचं नाव घेतलं, याबद्दल विचारलं असता त्यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधला.
दिपक केसरकर हे गृहराज्यमंत्री होते, कोकणतील नेते आहेत. फार बेडर माणूस आहे, असं मी ऐकलं. पण, काल रात्री पळून गेले ढुं*** पाय लावून, असे म्हणत संजय राऊत यांनी केसरकरांवर निशाणा साधला. तसेच, केसरकर कोण?, माझं अन् त्यांचा कधीच संवाद झाला नाही. ते पक्षात आहेत, मी त्यांचा आदर करतो. ते सावंतवाडीतून निवडून आलेत, ग्रामीण भागातून येतात. शरद पवारांचे अत्यंत्य निष्ठावंत होते. मग, आमच्याकडे आले, उद्धव ठाकरेंनी त्यांना पहिल्याच टर्ममध्ये त्यांना गृहराज्यमंत्री केले. तरीही ते गेले, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले केसरकर
संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु, संजय राऊत आमचे विधिमंडळातील नेते नाहीत. आम्ही त्यांच्यावर का बोलू, असा प्रतिप्रश्न करत, संजय राऊत फायर बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते, असा टोला दिपक केसरकर यांनी लगावला आहे. तसेच आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. ५५ आमदारांचा नेता १६ जण कसा बदलणार? असा सवालही दीपक केसरकर यांनी केला आहे.
तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाले, ते एका विशिष्ट परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाले. तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही भिन्न विचारांचे पक्ष आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाशिवाय दुसरं नाव दिसलं नाही. तेव्हा आम्ही त्यांना आग्रह केल्याचंही ते म्हणाले. शिवसेना भाजपमध्ये अडीच वर्षांचा जो काही करार होता तो झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. विधीमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री झाले असते, असंही ते म्हणाले.