शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:11 PM2023-11-29T19:11:36+5:302023-11-29T19:12:43+5:30
दत्ता दळवींना अटक करून पोलिसांनी आज त्यांना मुलुंडच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेवरून सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारायण राणेंवर जी कारवाई झाली तशीच उद्धव ठाकरेंवर करू, असा इशारा शिंदे गटाने दिलेला असतानाच शिंदेंना अपशब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक केली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता उमटू लागले असून शिंदे समर्थकांनी दळवींच्या महागड्या कारच्या काचा फोडल्या आहेत.
दत्ता दळवींना अटक करून पोलिसांनी आज त्यांना मुलुंडच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. असे असताना आता दळवींची कार फोडण्यात आली आहे. चार जणांनी दळवींच्या कारच्या काचा फोडल्याने ईशान्य मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही येत्या २४ तासांत प्रत्यूत्तर देऊ, असा इशारा आमदार सुनिल राऊत यांनी दिला आहे. हे कृत्य शिंदे गटाचे आहे. त्यांच्यात समोर येण्याची धमक नसल्याने मागून असा भ्याड हल्ला केला आहे. या लोकांची ओळख पटली असून त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाहीत तर येत्या 24 तासात त्यांना उत्तर देऊ. गाडी फोडणाऱ्यांच्या घराच्या काचाही शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
भांडुपमध्ये रविवारी 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी शिंदेंना हिंदुहृदय सम्राटवरून आक्षेपार्ह शब्द वापरला होता. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ व अपमानकारक विधान केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्याविरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता.