शिवसेना अपात्रता प्रकरणाचा मविआवर परिणाम होणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 12:35 PM2024-01-11T12:35:16+5:302024-01-11T12:38:01+5:30
Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता या निकालाचे राज्याच्या राजकारणावर तसेच महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेतील दोन्ही गटांसह महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल सुनावला. एकनाथ शिंदेंचीशिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगतानाच एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची ठाकरे गटाची मागणी राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारही पात्र आहेत, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता या निकालाचे राज्याच्या राजकारणावर तसेच महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना या निकालाचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
नाना पटोले म्हणाले की, शिवसेना फुटी प्रकरणातील निकालाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट मविआ अधिक मजूबत होईल, भारतीय जनता पक्षाचा डाव उघड झाला असून, जनताच भाजपाचा धडा शिकवेल. एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, निकाल देणारे न्यायाधीश ज्याच्यावर आरोप आहेत त्यांना भेटत असतील तर ते गंभीर आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होता त्यामुळे काही संगनमत झाले का? अशी शंका येते. असेही पटोले म्हणाले.
शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट दिसते. राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट वाटत असून हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे, अशी टीकाही काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाने देशात जे चालवले आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे, हे असेच चालू राहिले तर राजकीय पक्षांचे अस्तित्वच राहणार नाही. आणि भाजपाला तेच हवे आहे, देशात विरोधी पक्ष राहुच नये यासाठी यासाठी भाजपाचा कुटील राजकारण सुरु आहे म्हणूनच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा लढा आहे. लोकशाही व संविधान अबाधित राहिले पाहिजे ही काँग्रसेची भूमिका आहे, असेही नाना पटोले म्हणाले.