साहेब, युती तोडू नका; शिवसेना खासदारांना घसरगुंडीची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:29 AM2018-06-04T10:29:00+5:302018-06-04T10:29:00+5:30
आता शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल. यामुळे पक्षाचे काही नेते भाजपाच्या गोटात जातील.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून पक्षात दोन गट पडले आहेत. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठिंब्यावर विधानपरिषद किंवा राज्यसभेत असलेले नेते या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे संजय राऊत यांच्यासारखे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक भाषा करत असताना अनेक खासदार उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
लोकसभेतील एका खासदाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, 2014 साली भाजपाशी युती केल्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल. मात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय गत्यंतर नाही. युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचे या खासदाराने सांगितले.
यासाठी त्याने पालघर पोटनिवडणुकीचे उदाहरण दिले. पालघरमध्ये शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावूनही श्रीनिवास वनगा यांना भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे शिवसेनेने वास्तव स्वीकारले पाहिजे. युती तोडल्यास भाजपाचे नुकसान होईल, पण त्यामध्ये शिवसेनेचा फायदा काय?, असा सवाल या खासदाराने विचारला आहे. तसेच 2019 च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व वाढेल व पक्षाला महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतील, असा मतप्रवाह अनेक खासदारांमध्ये आहे.
परंतु, दुसरीकडे संजय राऊतांसारखे नेते भाजपाविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून युती तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला भाजपासोबत युती नको आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर तर शिवसैनिकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. याठिकाणी पहिल्यात प्रयत्नात शिवसेनेने तब्बल अडीच लाख मते मिळवली. हे खूप मोठे यश आहे. आजपर्यंत झालेल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये कोणत्याही नेत्याने भाजपाशी युती करा, असा आग्रह धरला नसल्याचा दावा संजय राऊत यांनी नुकताच केला होता. पक्षातील नेत्यांच्या या भूमिकांमुळे सध्या उद्धव ठाकरेंसमोर पेच उभा राहिला आहे.
मात्र, राजकीय जाणकारांच्या मते शिवसेनेने विरोधी पक्षात राहून भाजपाला विरोध करणे अधिक श्रेयस्कर ठरले असते. परंतु, सरकारमध्ये राहून विरोध केल्याने शिवसेनेने आपली विश्वासर्हता काही प्रमाणात गमावली आहे. त्यामुळे आता शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल. यामुळे पक्षाचे काही नेते भाजपाच्या गोटात जातील, अशी भीती पक्षनेतृत्त्वाला असल्याचे राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.