Shivsena: 'एकनाथ शिंदेंचा रामदास आठवले होईल', शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:27 PM2022-10-23T12:27:59+5:302022-10-23T12:48:39+5:30
Shivsena: राज्यात एमसीएसाठी झालेल्या राजकीय महायुतीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात आली.
मुंबई - शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप आणि राज्यपाल यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. तसेच, राज्यात एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे वानखेडे मैदानावर स्नेहभोजन होत असल्याचे सांगत सर्वांनाच रोखठोक शब्दात सुनावले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर प्रकाश टाकण्यात आला असून महामहीम राज्यपाल आता कुठे भूमीगत झाले आहेत? असा सवालही विचारण्यात आला आहे.
राज्यात एमसीएसाठी झालेल्या राजकीय महायुतीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात आली. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात असताना राजकीय स्नेहभोजन, राज्यपालांचे भूमिगत असणे, यावरुन शिवसेनेनं रोखठोक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकना शिंदेंचा भाजपकडून वापर करुन घेतला जात आहेत. मुख्यमंत्री पोलिसांच्या बदल्यावरुन नाराज असून ते साताऱ्यातील एका गावात जाऊन बसले होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदेंचा भविष्यात रामदास आठवले होईल, असे मला एका नेत्याने म्हटल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिंदेंचा रामदास आठवले होईल
मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या 'तोतया' गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, 'शिंदे यांचा रामदास आठवले होईल.'' हे विधान बोलके आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, 'शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.'' असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
राज्यपाल बेपत्ता!
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. 'ठाकरे' सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळ्या सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, विद्यापीठांचा कारभार याबाबत ते कमालीचे जागरूक होते. शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? त्यांचे ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या 'डॉक्टरेट' पदव्यांच्या चौकशींचे आदेश तरी त्यांनी द्यावेत. एकंदरीत राज्यपाल या दिवाळीत कोणतेही लवंगी फटाके फोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. महाराष्ट्राचा शेतकरी महाप्रलयात गटांगळय़ा खातो आहे. त्याची पिके वाहून गेली. त्याला सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र राज्यपालांनी शेतकऱयांच्या या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱयांचे सरकार सत्तेवर आहे? राज्यपालांची ही दिवाळी तशी थंडच दिसते. राज्यपाल व शिंदे-फडणवीस सरकारच्या माहितीसाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी देतो व विषय संपवतो.
दरम्यान, 'सेनगाव तालुक्यातील (जि. हिंगोली) गारखेडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पत्र पाठवून चक्क आपले गावच विक्रीस काढले आहे. गावविक्रीचा तसा फलक त्यांनी गावात लावला आहे!' ही तर सुरुवात आहे!