मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस सुरू होती. अखेर ती आज चव्हाट्यावर आली आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचा फोन टॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी महापौर आणि विभागप्रमुख राहिलेल्या दत्ता दळवी यांनी पदाचा राजीनामा पक्ष प्रमुखांकडे सोपवला होता.
विशेष म्हणजे या प्रकरणात दत्ता दळवी यांचा फोन टॅप करण्यात आला होता आणि हा फोन टॅप उपविभागप्रमुख जगदीश शेट्टींनी केल्याचं समोर आलं. त्यानंतर जगदीश शेट्टी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जगदीश शेट्टी यांची काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्याशी जवळीक असल्याचीही चर्चा आहे.