भाजपाच्या पारदर्शक कारभाराचा शिवसेनेला ताप
By admin | Published: April 29, 2017 02:03 AM2017-04-29T02:03:11+5:302017-04-29T02:03:11+5:30
पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्येक कामामध्ये चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे चालून आलेली एकही संधी
मुंबई : पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्येक कामामध्ये चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे चालून आलेली एकही संधी हे पहारेकरी सोडत नसल्याने शिवसेना नेत्यांचे धाबे दणाणले आहे. आधीच ठेकेदार मिळत नसल्याने नालेसफाईला विलंब झाला असताना भाजपाचे नेते नाल्यात उतरून पाहणी करू लागले आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा मुंबईकर आणि शिवसेनेलाही तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
ठेकेदार नेमण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपामध्ये खडाजंगी झाली होती. अखेर हा प्रस्ताव मंजूर होऊन नालेसफाईच्या कामाला सुरुवात होत नाही तोच भाजपाचे नेते व नगरसेवक नालेसफाई पाहणीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी ही झाडाझडती सुरू असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यात भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज नालेसफाईची पाहणी करून महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधला. भाजपाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिवसेनेच्याही हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)