मुंबई - राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. मनसेचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. असली गुवाहटीत आणि नकली 'वर्षा'वर आणि सेक्युलर गॅसवर, असे म्हणत गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. या ट्विटमधून त्यांनी राष्ट्रवादी अन् काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर, वर्षा बंगल्यावर असलेले मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नकली असल्याचे त्यांनी सुचवलं आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही मंगळवारीही मुख्यमंत्री यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. '21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस की, वर्षा बंगल्यातील शेवटचा दिवस' असं ट्वीट करत शिवसेनेतील बंडाळीवर भाष्य केलं होतं.
बाळासाहेबांचं हिंदुत्त्व आम्ही पुढे नेतोय
आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. "बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.