Join us

Shivsena: विरोधकांचं तोंड नसून ते गटार, संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 10:49 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता सभा होत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, मनसेनं या सभेला ही तोफ नसून लवंगी वाजली तरी पुरे.. असे म्हणत हिनवले. आता, संजय राऊत यांनी मनसेच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे, सर्वांचेच लक्ष ते काय बोलतील याकडे लागले आहे. मुख्यमंत्री आज सायंकाळी औरंगाबादेत पोहोचतील, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. यावेळी, मुख्यमंत्र्यांवर टिका करणाऱ्या मनसेसह विरोधी पक्षांवर त्यांनी निशाणा साधला. विरोधकांचं तोंड हे तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना काय बोलावं, कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल तुमचा व्यक्तीगत दोष असू शकतो, त्यांनी जे मोठं काम करुन ठेवलंय त्यामुळे. पण, अशाप्रकारच्या टिकेची आम्ही पर्वा करत नाही, असेही राऊत यांनी म्हटले. मनसेकडून शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेसंदर्भात केलेल्या टिकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 

उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करताना दिसून येत आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत. त्यामुळे, मनसेच्या औरंगाबादेतील सभेला आजची सभा उत्तर असेल, अशीही चर्चा रंगली आहे. 

मनसेनं काय केली होती टिका

उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मनसेने मात्र निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतमनसेऔरंगाबादमुख्यमंत्री