मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. दरम्यान, आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये, यासाठी पुढाकार घेणारे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रो मार्गांसाठी ही जमीन महत्वाची असल्याचे सांगत १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या आदेशाची लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्वाची आहे. यामुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचत आहेत. १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे."
बुधवारी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. उच्च न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे.तसेच, या प्रकरणी अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले. दरम्यान, या निकालाविरोधात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे संकेत मिळत आहेत.
विकासकामांमध्ये राजकारण करणे योग्य ठरणार नाही. याबाबत कायदे आणि नियमांच्या माध्यमातून काय पावले उचलता येतील, याचा निर्णय राज्याचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. कुठल्याही न्यायालयाच्या निर्णयाबाबत दाद मागण्याची तरतूद असते. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात दाद मागू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर, दुसरीकडे, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडवरून उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.