मुंबई: शिवसेना नेते आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात आणखी मंत्रिपदे देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली होती.
मराठीतील लोकप्रिय अभिनेते असलेल्या आदेश बांदेकर यांनी काही वर्षांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले होते. शिवसेनेत आपला जम बसवताना त्यांना या इमेजचा फायदा झाला. अल्पावधीतच बांदेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळातील नेत्यांमध्ये स्थान मिळवले. त्यांनी 2014 मध्ये दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता.
>मध्य प्रदेशप्रमाणेच...मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सरकारने अलीकडेच आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील पंढरपूर, शिर्डी आणि मुंबईतील सिद्धिविनायक या प्रमुख देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला आहे. सुरेश हावरे आणि अतुल भोसले हे भाजपाचे नेते तर आदेश बांदेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत.