'दिल्लीच्या डोंबाऱ्याकडून फोन आल्यावर माकडचाळे', दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:38 PM2022-05-14T15:38:31+5:302022-05-14T15:45:48+5:30
मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अटक झालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सध्या जामीनावर बाहेर आहेत.
मुंबई-
मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अटक झालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सध्या जामीनावर बाहेर आहेत. जामीनावर सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीत पोहोचलं आहे. आज दोघांनी ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करत दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण केलं. आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत बीकेसी येथे जाहीर सभा आहे. या सभेच्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाकरे सरकारला सद्बुद्धी येवो यासाठी महाआरती केल्याचं राणा दाम्पत्यानं म्हटलं. यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.
'जय हनुमान ज्ञान गुण सागर...', नवनीत राणांचं नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण; पाहा Video
दिल्लीच्या डोंबऱ्यांकडून फोन आल्यावर तुम्ही माकडचाळे करणार का? असा सवाल उपस्थित करत दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. दिपाली सय्यद यांनी याबाबतचं एक ट्विट केलं आहे. "आता राणा दाम्पत्याला औरंग्याच्या दर्ग्यात घुसून हनुमान चालीसा वायाचला दिल्लीवरुन आदेश आला नाही का? नाटक कंपनी माकडचाळे फक्त दिल्लीच्या डोंबऱ्यांकडून फोन आल्यावरच करणार का?", असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
आता राणा दामपत्याला औरंग्याच्या दर्ग्यात घुसुन हनुमान चालीसा वाचायला दिल्लीवरून आदेश आला नाही का ? नाटक कंपनी माकडचाले फक्त दिल्लीच्या डोंबार्याकडुन फोन आल्यावरच करणार का? @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 14, 2022
देशातील पहिल्या नंबरचे सक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी नव्हे, तर मोदींसाठी संकट आहेत. मोदींचे संकट आपल्या अंगावर घेणाऱ्या राणाबाई तुम्ही चालत या किंवा उडत या...शिवसेना तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राणा दाम्पत्यानं आज नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरापासून ते कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा केली. त्यानंतर हनुमान मंदिरात आपल्या समर्थकांसह महाआरती केली. यावेळी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण देखील केलं. राणा दाम्पत्यानं यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना भगवान हनुमानाकडे करणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं होतं. तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करुन दाखवतो असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना हिंमत असेलतर आधी औरंगाबादच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात पाडून दाखवा. तेव्हाच मी तुम्हाला मानेल, असं त्या म्हणाल्या. तसंच उद्धव ठाकरेंनी आजच्या जाहीर सभेची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने करुन दाखवावी, असंही नवनीत राणा म्हणाल्या.