“CM उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबाबत काही बोलले नाहीत”; शिवसेना नेत्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:22 PM2021-10-20T12:22:36+5:302021-10-20T12:23:39+5:30

आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेत्याने पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

shivsena leader kishor tiwari criticised cm uddhav thackeray over dasara melava speech | “CM उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबाबत काही बोलले नाहीत”; शिवसेना नेत्याची खंत

“CM उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबाबत काही बोलले नाहीत”; शिवसेना नेत्याची खंत

Next

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) अनेकार्थाने गाजल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, आता आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेत्याने पक्षालाच घरचा आहेर दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांबाबत काही बोलले नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. 

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांबद्दल काहीही बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले असते तर बरे वाटले असते, अशी शेतकऱ्यांची भावना होती, असे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. पण मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मी शेतकऱ्यांना सांगितले, असेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी माजले आहेत

पाठोपाठ येणाऱ्या आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या वर्षाचीही नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही, यंदा तर पंचनामेच झालेले नाहीत. जिल्हाधिकारी माजले आहेत, अशी टीका करत मंत्र्यांनी आपल्या कामाबाबत विचार करावा, मंत्र्यांना ग्रामीण जनता निवडणूक देते. विदर्भातील हजार शेतकरी आत्महत्यांची नैतिक जबाबदारी विदर्भातील मंत्र्यांनी घ्यावी. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढण्यास प्रशासन आणि सरकार जबाबदार असल्याचेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 

योजना आखण्यात राज्य आणि केंद्र अपयशी

कोरोना संकटात अधिकारी गावात जात नाही. नोकरशाहीच्या उदासीनतेचा हा परिणाम असून, योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार आणि केंद्र अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री याचा आढावा घेतात की नाही माहिती नाही. पण जिल्हाधिकारी आणि प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, या शब्दांत किशोर तिवारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान निर्दोष आहे म्हणत त्याच्या जामिनासाठी किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. 
 

Web Title: shivsena leader kishor tiwari criticised cm uddhav thackeray over dasara melava speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.