Join us

संजय राऊत अन् संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:01 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. 

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी संजय पवार यांचं नाव जाहीर केलं. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव जाहीर केल्यानंतर आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारी एक वाजता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. 

संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.

विधानसभेसाठी मिळाली नाही संधी पण...

संजय पवार हे ताराबाई पार्कातील एसटी कॉलनीत राहतात. त्यांच्या अनंत नावाच्या बंगल्यावर कायमच शिवसेनेचा भगवा फडफडत असतो. पवार हे कोल्हापूर महापालिकेत तीन वेळा ताराबाई पार्क प्रभागातून नगरसेवक झाले. स्थायी सभापती, विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी महापालिकेत भूषवले. शिवसेनेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते गेली २० वर्षे प्रयत्न करत आहेत; परंतु त्यांना ही संधी कधी मिळाली नाही.

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही- संभाजीराजे

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही. परंतू तशा कोणत्याही घडामोडी अजून तरी दिसत नाहीत. जे पक्ष उमेदवारीस पाठिंबा देतील, त्या पक्षांना सहयोग असू शकेल. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोगी सदस्यत्व नव्हे. त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हटल्यावर सभागृहात त्या पक्षांच्या धोरणांना पाठिंबा, मतदान त्या पक्षाच्या बाजूने या गोष्टी मला मान्य असतील. परंतू थेट कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्विकारणार नाही.

टॅग्स :संजय राऊतराज्यसभासंजय पवारशिवसेनाउद्धव ठाकरे